मुंबई: एअर इंडिया (Air India) जेव्हापासून टाटा ग्रुप ( Tata group) कडे आली आहे. तेव्हापासून कर्मचाऱ्यांचे चांगले दिवस सुरु झाले आहेत. असं म्हणायला काही हरकत नाही. कर्मचाऱ्यांच्या पगारात होणारी कपात थांबली आहे. ज्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणारी कपात थांबली त्या दिवशी टाटा ग्रुपकडून आणखी एक घोषणा करण्यात आली होती. ही घोषणा होती कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या वैद्यकीय सुरक्षेची. टाटा ग्रुपकडून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ग्रुप मेडिकल इंश्योरेंसचं ( Group Medical Insurance) कवच मिळणार आहे.
टाटा ग्रुप नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांची विशेष काळजी घेत असतं याची अनेक उदाहरणं आहे. एअर इंडियाचा चार्ज जेव्हा टाटा ग्रुपने आपल्या हाती घेतला तेव्हा पासून कर्मचाऱ्यांमध्ये एक समाधानाचं वातावरण दिसून येत होतं. एअर इंडिया मधील कायमस्वरुपी आणि निश्चित मुदतीवर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रुप मेडिकल इंश्योरेंसचा (Group Medical Insurance) फायदा घेता येणार आहे .
एअरलाइन्सकडून कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या ग्रुप मेडिकल इन्शुरन्समध्ये कर्मचाऱ्याचा 7.5 लाख रुपयांचा विमा असेल. यामध्ये एका कुटुंबातील जास्तीत जास्त ७ सदस्य सहभागी होऊ शकतात. यामध्ये कर्मचाऱ्याची पत्नी किंवा पती, तीन मुले आणि आई-वडील तसंच सासू - सासरे यांचा समावेश असेल. कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत कर्मचारी ही विमा पॉलिसी वापरू शकतात.
ग्रुप मेडिकल इन्शुरन्स सुविधा आणि पगार कपातीव्यतिरिक्त टाटा ग्रुपने नुकतेच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना शेअरहोल्डर बनण्याची संधी दिलीय. विमान कंपनीकडून कर्मचाऱ्यांना स्टॉक ऑप्शन (ESOP) दिला जाईल. या अंतर्गत कर्मचारी कंपनीचे भागधारक बनू शकतील. या प्रक्रियेमागील कंपनीचा उद्देश कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारणे हा आहे.