प्रवीण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : शॉर्ट सक्रिटमुळे किंवा इतर कोणत्यातरी कारणामुळे आग लागल्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या, पाहिल्या असतील. पण एका उंदरामुळे (Rat) स्फोट होऊन घरात आग (Fire) लागल्याची घटना कधी ऐकली आहे का? गोंदियात प्रत्यक्षात अशीच एक घटना घडली आहे. एका उंदरामुळे घरातील फ्रीजचा स्फोट (Fridge Explosion) झाला आणि या स्फोटात आग लागून घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालं. गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील सु्र्याटोला परिसरात ही घटना घडलीय. इथल्या शिवाजी पुतळ्याजवळ संजू गाते हे आपल्या कुटुंबासह राहतात. फ्रीजच्या स्फोटात संजू गाते यांच्या घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालं. इतकंच नाही तर घरात साठवण केलेलं धान्यही नष्ट झालं. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
काय घडलं नेमकं?
गोंदिया शहरातील सुर्याटोला परिसरात राहणाऱ्या संजू गाते यांच्या घरात देवजवळ दिवा पेटवण्यात आला होता. या पेटत्या दिव्यातील वात उंदराने फ्रीज जवळ झाली. यामुळे फ्रीजला आग लागून फ्रीजचा स्फोट झाला. आगीने क्षणार्धात उग्र रुप धारण केलं. गाते यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आगीने रौद्र रुप धारण केलं आणि घराती सर्व साहित्य जळून खाक झालं. आगीत साठवून ठेवलेलं धान्यही नष्ट झालं. संजू गाते यांच्या घराचं प्रचंड नुकसान झालं.
संजू गाते आणि त्यांचं कुटुंब हे रात्री एकत्र जेवत असताना अचानक फ्रीजला आग लागली आणि मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकताच घरातील सर्वजण बाहेर पडले. आग लागलेल्या खोलीत पाणी टाकून आग विझविण्यास सुरवात केली, परिसरातील लोकांनी सुध्दा आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अग्निशमन दलाला बोलाविण्यात आले व वेळेवर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र आगीत गाते यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून घराची छताचे देखील मोठे नुकसान झालं.
अकोल्यात धावत्या ट्रकला आग
दरम्यान, अकोल्यातील एमआयडीसी क्रमांक चारमध्ये अचानक एका चालत्या ट्रकच्या ड्रायव्हर केबिनमध्ये आग लागल्याची घटना घडलीय..आग इतकी भीषण होती की संपूर्ण ट्रक जळून खाक झाला, तर आगीत चालकही गंभीर भाजला. परिसरातील नागरिकांनी ट्रक ड्रायव्हरला तात्काळ बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले. अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन ट्रकला लागलेली आग विझवली. या आगीत ट्रकच मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान ट्रक चालकाला उपचारार्थ शासकीय रुग्णालय अकोला इथं दाखल करण्यात आलं आहे. सध्या ट्रक चालकावर उपचार सुरू असून एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.