Bhandardara News: पर्यावरण बदल म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगची सध्या जगभरामध्ये चर्चा आहे. अगदी संयुक्त राष्ट्रांपासून ते काही दिवसांपूर्वी भारतात पार पडलेल्या जी-20 परिषदेपर्यंत अनेक अंतरराष्ट्रीय मंचांवरुन यासंदर्भात चर्चा होताना दिसते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अनेक प्राण्यांच्या प्रजाती नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा जगभरातील वेगवेगळ्या भागांवर परिणाम होत असतो. याचबरोबर अनेकदा लोकांच्या असंवेदनशीलतेचा फटका अशा दुर्मिळ प्राण्यांना बसतो. भंडाऱ्यामधील एका छोट्या गावामध्ये असाच काहीसा प्रकार घडला आहे. मात्र आता या प्राण्यांच्या मदतीसाठी याच गावातील एक तरुण धडपडताना दिसत आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यामधील कोलारी या छोट्याशा गावातील बीएससीचा विद्यार्थी असलेला अलगुज झंजाड असं या तरुणाचं नाव आहे. अलगुजला खरं तर लहानपणापासूनच निसर्गाबद्दल ओढ आहे. त्याने त्याच्या घराशेजारील बांधकामाच्या ठीकाणी कामगारांनी अस्ताव्यस्त केलेले सरड्यांची अंडी संग्रहीत करुन व त्यांना कृत्रिमरित्या उबवण्यासाठी वातावरण तयार करून त्यांची देखरेख केली. काही दिवसांनंतर ही अंडी उबविली. अंड्यामधून 8 ते 10 सरडयांची पिल्लं बाहेर पडली. पिल्लू मोठे झाल्यानंतर अलगुजने त्या पिल्ल्यांना नैसर्गिक अधिवासामध्ये सोडून दिले.
सामान्यपणे सरड्यासारख्या सरपटणाऱ्या प्राण्याबद्दल लोकांच्या मनात फार भीती असते. असं असतानाही अलगुजने फार धैर्याने या सरड्याच्या पिल्लांचा जीव अंड्यात असतानाच वाचवला आणि त्यांचा जन्म सुखरुपपणे होईल याची काळजी घेतली. सध्या अलगुजवर गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. छोट्याश्या गावातील एका तरुणाने जबाबदारीचं भान ठेवल्याने आज या दुर्मीळ सरड्यांना जीवनदान मिळालं आहे. सध्या पंचक्रोषीमध्ये अलगुजच्या या आगळ्यावेगळ्या निसर्ग प्रेमाची चर्चा आहे. मात्र आपल्याला निसर्ग आणि प्राण्यांची आवड असल्याने हे काम आपल्या हातून झाल्याचं अलगुज सांगतो.
आज मानवाने अनावश्यकरीत्या निसर्गामध्ये हस्तक्षेप केल्याने निसर्गातील वैविध्येतेला तसेच जीवजंतूच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. याच कारणामुळे निसर्गाचे संतुलन सुद्धा बिघडले आहे. त्यामुळे आता निसर्गातील जैवविविधता जपणे व त्यांचे संवर्धन करणे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. हे जर आपल्याला करता आलं तरच मानव जात पृथ्वीवर निसर्गाशी एकरुप होऊन सुखी व समाधानी राहील, असे अलगुजचे म्हणणे आहे. अलगुजने आपल्या माध्यमातून या सरड्यांना जीवनदान मिळाल्याचं समाधान असल्याचं सांगितलं. तसेच पुढे बोलताना असं काही झालं तर परत आपण मदतीला तयार असून असंही अलगुजने म्हटलं आहे.