अडीचशेहून अधिक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण

रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अनेकांवर जमिनीवर उपचाराची वेळ आली. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अचानक पोटदुखी, जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला.

Updated: Nov 12, 2017, 03:34 PM IST
अडीचशेहून अधिक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण title=

औरंगाबाद : औरंगाबादच्या छावणी परिसरातील अडीचशेहून अधिक नागरिकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याचं समोर आलंय. शनिवारी रात्री उशिरापर्यंत एकापाठोपाठ एक शेकडो रुग्ण छावणीतील सामान्य रुग्णालयात दाखल झाले. 

अनेकांवर जमिनीवर उपचाराची वेळ

रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अनेकांवर जमिनीवर उपचाराची वेळ आली. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर अचानक पोटदुखी, जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला.

 लहान मुले, युवक-युवतींना आजाराने वेढले

लहान मुले, महिला-पुरुष, युवक-युवती, ज्येष्ठ अशा सर्वांना या आजाराने वेढले असल्यामुळे उपचारासाठी नागरिकांनी छावणी सामान्य रुग्णालयात धाव घेतली.प्रत्येकजण जुलाब, उलट्यांचा त्रास असल्याचे सांगत होता. शनिवार सकाळपासून सुरू झालेली रुग्णांची गर्दी रात्री उशिरापर्यंत कायम होती. 

रुग्णांना उपचारासाठी सलाईन लावण्याची वेळ

रुग्णांना उपचारासाठी सलाईन लावण्याची वेळ येत होती. मात्र जागेअभावी जमिनीवर, बाकड्यांवर आणि एकाच खाटेवर दोघांना सलाईन लावण्याची वेळ आली. गेल्या दोन दिवसांत परिसरातील अनेकांना हा त्रास झाला. 

खाजगी रुग्णालय आणि घाटी रुग्णालयात अनेकांनी उपचार घेण्यावर भर दिल्याने, हा आकडा यापेक्षा अधिक असण्याची शक्यता वर्तवली जातेय.