मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर विशेष गाड्या सोडण्यात आल्या. मात्र, आरक्षण सुरु होताच पहिल्या दिवशी सर्व गाड्या फुल्ल झाल्यात. त्यामुळे मध्य रेल्वेला आणखी जादा सोडाव्या लागणार आहेत.
२२ ते २४ ऑगस्ट या दरम्यान गणपतीसाठी विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या. काल मंगळवारी ५ गाड्यांचे आरक्षण दुपारीपर्यंत फुल्ल झाले. त्यामुळे यावर्षीह गणपती उत्सवाला गावी जाणाऱ्यांना पुन्हा गर्दीचा सामना करावा लागणार आहे.
२५ ऑगस्टला गणेश चतुर्थी आहे. या दिवसापासून गणेशोत्सव सुरु होतो. कोकणात गणपतीला जाणाऱ्यांची नेहमी गर्दी होत असते. त्यामुळे एसटीही जादा गाड्या सोडते. तसेच रेल्वेही जादा गाड्या सोडते. गेल्या आठवड्यात रेल्वेच्या १४२ विशेष फेऱ्या जाहीर करण्यात आल्यात.
मुंबई सीएसएमटी-करमाळी, दादार-सावंतवाडी, पुणे-सावंतवाडी या विशेष गाड्यांचे आरक्षण खुले झाल्यावर त्याच दिवशी फुल्ल झाले. तसेच गणपतीसाठी डेबल डेकर एक्स्प्रेस सुरु करण्यात आली आहे. ही गाडी रत्नागिरीपर्यंत धावणार आहे. मंगळवारी ही गाडी सोडण्यात येणार आहे. तिला मुख्य स्थानकात थांबा देण्यात आलाय. पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी आदी ठिकाणी ही गाडी थांबणार आहे.
गणेशोत्सवासाठी आणखी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या वांद्र, वसई रोड तसेच अहमदाबाद स्थानकातून गाड्या सोडण्यात येणार आहेत.