Mumbai Goa Highway : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच आता चाकरमान्यांचे पाय हळुहळू गावाच्या दिशेनं वळताना दिसत आहेत. गणपती येण्याच्या काही दिवस आधी गावाकडे निघणाऱ्या आणि त्यातही बहुतांशी कोकणच्या दिशेनं जाणाऱ्या अनेकाचीच ही वाट मुंबई- गोवा महामार्गावरून पुढे जात असते. याच रस्त्यासंदर्भातील एक महत्त्वाची माहिती समोर आली असून, त्यामुळं या मार्गानं प्रवास करणाऱ्यांवर याचा थेट परिणाम होताना दिसणार आहे. (Ganeshotsav 2024)
गणेशोत्सव काळात मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकर मान्यांचा प्रवास निर्विघ्न, सुखकर व्हावा यासाठी सध्या काही उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्याचाच भाग म्हणून अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उपलब्ध माहितीनुसार या निर्णयाच्या धर्तीवर 5 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 8 सप्टेंबर रोजी 11 वाजेपर्यंतच्या कालावधीत ही वाहतूक बंदी लागू राहणार आहे. 5, 7 दिवसांच्या गणेशमूर्तीचं विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास यासाठी 11 सप्टेंबर रात्री 8 ते 13 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंतसुद्धा ही वाहतूक बंदी राहणार आहे. पुढे अनंत चतुर्दशी अर्थात 11 दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी आणि त्यानंतरच्या परतीच्या प्रवासासाठी 17 सप्टेंबर सकाळी 8 ते 18 सप्टेंबर रात्री 8 वाजेपर्यंत ही वाहतूक बंदी सुरू राहणार आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीस या मार्गावर काही दिवसांना बंदी घातल्यामुळं त्याचा थेट फायदा सामान्य प्रवाशांना होताना दिसणार आहे.
दरम्यान सोमवार, 26 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करणार आहेत. दुपारी 12 वाजता पळस्पे इथून त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार आहे. रायगड , रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा तीनही जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचा हा पाहणी दौरा असेल. मागील 14 वर्षांपासून या महामार्गाचं काम रखडलं आहे. त्यामुळे कोकणवासियांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.
सध्या गणेशोत्सवही जवळ आला असून, त्यासाठी येणाऱ्या गणेशभक्त चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री महामार्गाच्या सद्यस्थितीचा आढावा घेवून अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना करतील. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या डागडुजीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून अनेक ठिकाणी पेव्हरब्लॉक टाकून खड्डे बुजवण्याचे काम केले जात आहे