जुहू समुद्रकिनारी वीज कोसळली; गणेश विसर्जनासाठी तैनात तरुणाचा दुर्देवी मृत्यू

  आज मुंबईतील चौपाटीचा परिसर गर्दीने फुलून गेला आहे. बाप्पाच्या विसर्जनाला पावसानेही हजेरी लावली आहे. मुंबईतील अनेक भागांत विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत विसर्जनाच्या दिवशीच एक दुर्घटना घडली आहे. 

गणेश कवाडे | Updated: Sep 28, 2023, 06:47 PM IST
जुहू समुद्रकिनारी वीज कोसळली; गणेश विसर्जनासाठी तैनात तरुणाचा दुर्देवी मृत्यू title=
प्रातिनिधिक फोटो

Mumbai News:  मुंबईतील चौपाटीचा परिसर आज गर्दीने फुलून गेला आहे. बाप्पाच्या विसर्जनाला पावसानेही हजेरी लावली आहे. मुंबईतील अनेक भागांत विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत विसर्जनाच्या दिवशीच एक दुर्घटना घडली आहे. मुंबईच्या जुहू समुद्रकिनाऱ्यावर गणपती विसर्जनासाठी तैनात असलेल्या एका तरुणावर वीज पडल्याची दुर्घटना घडली आहे. या तरुणाचा कूपर रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

तरुणावर वीज कोसळल्याची घटना घडल्यानंतर त्याला लगेचच रुग्णवाहिकेतून विले पार्लेयेथील कूपर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होती. मात्र तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. या तरुणाला विसर्जनासाठी जुहू चौपाटीवर आज तैनात करण्यात आले होते. दुपारपासून मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात झाल्यानंतर वीज कोसळल्याची घटना घडल्याचे सांगण्यात येतेय.

मुंबईत पावसाला सुरूवात 

बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांना वरुणदेवाने हजेरी लावली आहे. मुंबईतील काही भागांत दुपारुनच अंधारुन आले होते. अनेक भागात विजांच्या कडाकडाटासह पावसाने सुरुवात केली होती. हवामान विभागाकडून पुढील 24 तास महत्त्वाचे असण्याचे सांगण्यात आले आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, कर्नाटक गोवा आणि केरळ किनारपट्टीवर काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

चौपाट्यांवर जाताना ही काळजी घ्या

विसर्जनासाठी चौपाटीवर जाताना काय काळजी घ्यावी याबाबत मुंबई महापालिकेने सूचना जारी केल्या आहेत. तसंच, चौपाट्यांवर भरती व ओहोटी किती वाजता आहे. याबाबतही माहिती दिली आहे. आनंद चतुर्दशीच्या दिवशी समुद्राला सकाळी 11 वाजता 4.56 मीटरची भरती असेल. तर संध्याकाळी 5.08 वाजता 0.73 मीटरची ओहोटी असेल. तसेच, रात्री 11.24 वाजता 4.48 मीटर उंचीची भरती असेल. त्यामुळं याकाळात विसर्जनासाठी जात असताना खबरदारी घ्यावी, असं अवाहन करण्यात आलं आहे.