कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी

येवा... कोकण आपलाच असा..... 

Updated: Aug 27, 2019, 11:36 AM IST
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी title=

मुंबई : अवघ्या आठवडाभरावर गणेश चतुर्थी येऊन ठेपली आहे. मोठमोठ्या गणोशोत्सव मंडळांनी गणेश मूर्ती मंडपात नेण्याची घाई सुरु केली आहे. तर घरगुती गणपतींच्या सजावटीनेही चांगलाच जोर पकडला आहे. या साऱ्यातच कोकणच्या दिशेने जाणाऱ्या मोठ्या वर्गाची लगबग सुरु आहे ती वेगळीच. कोकणच्या दिशेने निघणाऱ्या अशाच असंख्य गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 

गणेशोत्सवासाठी कोल्हापूरमार्गे कोकणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय राज्य सरकारडून घेण्यात आला आहे. मात्र या टोल माफीसाठी परिवहन विभागांकडून पास घ्यावा लागणार आहे, असं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. 

गणेशोत्सवाचं पर्व सुरु होण्यापूर्वी दोन दिवसांपासून म्हणजेच ३० ऑगस्टपासून कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्य़ा वाहनांचा टोल माफ करण्यात येणार आहे. १२ सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत या मार्गावरील कोकणाकडे जाणाऱ्या आणि पास असणाऱ्या वाहनांना टोल माफ असेल. मुख्य म्हणजे मोठ्या संख्येने या काळात मुंबई आणि इतर विभागांतून कोकणच्या दिशेने जाणाऱ्यांचा आकडा पाहता या मार्गावरी रस्त्यांच्या दुरुस्तीचं कामही हाती घेण्यात आलं आहे, जे लवकरच पूर्णत्वास जाणार आहे. त्यामुळे एकंदरच गणरायाची सेवा करण्यासाठी म्हणून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांवर बाप्पा प्रसन्न झाला, असंच म्हणावं लागेल.