अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती: राज्यभरात गणेश विसर्जनाची जोरदार तयारी सुरु आहे. राज्याभरातील महापालिकांकडून गणेश विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. पण अमरावती शहरात मात्र वेगळीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात महापालिकेमार्फत कृत्रिम तलाव बनवण्यात आला आहे. या कृत्रिम खड्डयात विसर्जनासाठी शहरातील हजारो नागरिक येत असतात. मात्र या ठिकाणी महापालिकेकडून गढूळ, दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा केला असल्याने भक्तांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
या विषयी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता हे पाणी स्वच्छ असल्याचा खोटा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे गणेश भक्त संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान या ठिकाणी आमदार रवी राणा यांनी जाऊन पाहणी केली असता दुर्गधीयुक्त पाण्याचा पुरवठा केला असल्याचे निदर्शनाला आले आहे.
हे पाणी दूषित नाही. हे तलावाचे पाणी नैसर्गिक आहे. हा नैसर्गिक गाळ आहे. हे टॅंकमधील पाणी स्थिर होईल तेव्हा गाळ खाली जाणार आणि स्वच्छ पाणी आहे. हे पाणी योग्य आहे, अशी प्रतिक्रिया महापालिका उपअभियंता नितीन बोबडे यांनी दिली आहे. समोर दुर्गंधीयुक्त पाणी दिसत असताना पालिका असा दावा कसा काय करु शकते? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
यावर रवी राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. छत्री तलाव हा ब्रिटीश कालिन तलाव आहे. अमरावतीतील सर्व छोट्या मोठ्या तलावांची मी पाहणी केली. घरगुती, सार्वजनिक गणपतीचे या तलावांमध्ये विसर्जन होते. हजारो लोकं येथे येतात. मी सर्वाचा आढावा घेतला. विसर्जन तलावात पाण्याची दुर्गंधी येत होता. मी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. त्यांनी स्वत: हा तलाव पाहीला. आणि अधिकाऱ्यांना हे स्वच्छ करण्याचे निर्देश दिले. गणपती बाप्पा आपले दैवत आहे. भाविकांच्या भावना याच्याशी जोडलेल्या असतात. त्यामुळे कचरा साफसफाई, लाईटची व्यवस्था पाहण्यात येत आहे. मनपा आयुक्त आणि पालिका आयुक्त यांना यासंदर्भातील निर्देश देण्यात आले आहेत, असे राणा म्हणाले.