औरंगाबाद: मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर आज (मंगळवार, २४ जुलै) अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. शिंदे यांच्या कुटुंबियांना ५० लाख रूपयांची मदत करावी, तसेच, त्यांच्या बंधुंना सरकारी नोकरीत घ्यावे. तसेच, शिंदे यांना हुतात्मा म्हणून घोषीत करावे, अशी काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांची मागणी होती. दरम्यान, ही मागणी पूर्ण झाल्याशिवाय आपण मृतदेह ताब्यत घेणार नाही यावर कुटुंबिय ठाम होते.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना सरकारनं १० लाख रुपयांची मदत जाहीर केली. शिवाय शिंदेंच्या धाटक्या भावाला सरकारी नोकरीचं आश्वासनही दिलं. तसेच, इतर मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारला पत्र दिल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर शिंदे कुटुंबियांनी काकासाहेबांचा मृतदेह ताब्यात घेतला.
काकासाहेब शिंदेंनी काल (सोमवार, २३ जुलै) मराठा आरक्षणासाठी औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूरमध्ये गोदावरी पात्रात उडी घेतली. त्यांना प्रवाहातून बाहेर काढण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शिंदेंच्या कुटुंबियांनी सरकारी मदत आणि आरक्षणाच्या घोषणेची मागणी करत रात्रभर पुणे -औरंगाबाद महामार्ग रोखून धरला होता.