Pune : 'द केरला स्टोरीज' (The Kerala Story) चित्रपटाच्या प्रदर्शनावरून पुण्यातील एफटीआयआय (FTII) मध्ये चांगलाच राडा झाला. एफटीआयआय मधील मेन थिएटरमध्ये पुण्यातील 'मीती' या संस्थेच्या माध्यमातून 'द केरला स्टोरीज'च्या शोच आयोजन करण्यात आल होतं. मात्र, यावेळी एफटीआयआयमधील काही विद्यार्थ्यांनी या शो ला विरोध केला. विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत शो बंद करण्याची मागणी केली. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक ही या शोसाठी आले होते. विद्यार्थ्यांकडून झालेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या पोलीस बंदोबस्तात हा शो पार पडला. हा चित्रपट प्रचारू चित्रपट असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.
का होता विद्यार्थ्यांचा विरोध?
भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेत (FTII) आज सकाळी 'द केरळ स्टोरी' च्या शोचं आयोजन करण्यात आलं होतं. पण संस्थेतील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थी संघटनेने या शोला विरोध करत गोंधळ घातला. शो सुरु होताच विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी सुरु केली. एफटीआययमध्ये आधीपासूनच विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. 2020 च्या बॅचमधील पाच विद्यार्थ्यांना वर्षभरातील अपुरी हजेरी आणि अपुरे गुण यामुळे काढून टाकण्यात आलं आहे. याविरोधात एफटीआयआय स्टुडंट्स असोसिएशनने गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे.
त्यातच विद्यार्थी संघटनांनी द केरळ स्टोरीच्या शोलाही विरोध केला, त्यामुळे एफटीआयआयमधलं वातावरण तापलं. त्यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात शोचं स्क्रिनिंग पार पडलं.
अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी
दरम्यान, 'द केरळ स्टोरी' चित्रपटात आसिफाचं पात्र साकारणाऱ्या सोनिया बालानी या अभिनेत्रीला धमक्या दिल्या जात आहेत. धर्मपरिवर्तन केलेल्या 7 हजार मुलींना भेटल्याचा दावा सोनिया बालानीने केला आहे. पश्चिम बंगालमध्ये चित्रपटावर टाकण्यात आलेल्या बंदीवरही सोनियाने प्रश्न उपस्थित केला आहे. चित्रपटावर बंदी आणणं चुकीचं असल्याचं सोनियाने म्हटलं आहे. या चित्रपटातील इतर कलाकारांनाही धमक्या मिळत असल्याचं सोनियाने म्हटलंय.
द केरळ स्टोरी प्रेक्षकांना आवडत असून मुस्लिम धर्मातील मुलींनाही हा चित्रपट पसंत पडल्याचं सोनियाने म्हटलं आहे. अनेक मुस्लीम तरुणींनी संपर्कस साधत आपल्या अभिनयाचं कौतुक केल्याचं सोनिया म्हणते.
बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई
चित्रपटावरून वाद सुरु असला तरी द केरळ स्टोरी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई सुरुच आहे. प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाने पंधरा दिवसातच 150 कोटीचा टप्पा पार केला आहे. लवकरच हा चित्रपट 200 कोटी क्लबमध्ये जाईल असं मत चित्रपट समीक्षक व्यक्त करतायत. या चित्रपटाने मोठी स्टारकास्ट असलेल्या सिनेमांनाही कमाईच्याबाबतीच मागे टाकलं आहे.