मालेगाव गोळीबाराने हादरलं! अज्ञातांनी माजी महापौरांवर मध्यरात्री झाडल्या 3 गोळ्या; प्रकृती चिंताजनक

Former Malegaon Mayor Shot: मध्यरात्रीनंतर काही अज्ञात व्यक्तींनी माजी महापौरांवर अंदाधुंद गोळीबार केला. मोटरसायकलवरुन आलेल्या हल्लेखोऱ्यांनी एकूण तीन गोळ्या झाडल्या असून माजी महापौरांना उपचारासाठी नाशिकमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे,

स्वप्निल घंगाळे | Updated: May 27, 2024, 08:08 AM IST
मालेगाव गोळीबाराने हादरलं! अज्ञातांनी माजी महापौरांवर मध्यरात्री झाडल्या 3 गोळ्या; प्रकृती चिंताजनक title=
मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला

Former Malegaon Mayor Shot: मालेगाव पुन्हा एकदा गोळीबाराने हादरलं आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मालेगावचे माजी महापौर तसेच ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन अर्थात ‘एमआयएम’चे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर गोळीबार झाला आहे. अज्ञात व्यक्तींना अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर गोळ्या झाडल्या. मोटरसायकलवरुन आलेल्या या अज्ञात हल्लेखोरांनी अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर एकूण तीन गोळ्या झाडल्या. अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

अब्दुल मलिक युनूस ईसा यांच्यावर झाडण्यात आलेल्या तिन्ही गोळ्या त्यांना लागल्या. एक गोळी हाताला, एक पायाला तर एक छातीत लागल्याची माहिती समोर येत आहे. अब्दुल मलिक युनूस ईसा यांना तातडीने उपचारासाठी नाशिकमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी रुग्णालयात जाऊन अब्दुल मलिक युनूस ईसा यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आरोपींना तात्काळ अटक केली जावी अशी मागणी केली आहे. मालेगावमध्ये गुंडाराज सुरु असून आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नाही अशी टीका इस्माईल यांनी केली आहे.

प्रथामिक माहितीनुसार, रात्री 1 ते दीड वाजण्याच्यादरम्यान गोळीबाराची घटना घडली. जुना आग्रा रोडवरील  ताज मॉल कॉम्पलेक्समध्ये अब्दुल मलिक युनूस ईसा हे त्यांच्या काही सहकाऱ्यांबरोबर असतानाच हा हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतर मलिक यांना शहरातील द्वारकामणी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी नाशिकमधील रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

या प्रकरणी कोणतीही अधिकृत माहिती जारी करण्यात आलेली नाही. सदर हल्ल्यानंतर मालेगावमध्ये तणावपूर्ण शांतता आहे. रात्री मोठ्याप्रमाणात मलिक समर्थक त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयाबाहेर जमले होते. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून, घटनास्थळाची पहाणी केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणामध्ये आता सीसीटीव्ही आणि इतर माध्यमातून माहिती गोळा केली जाईल असं समजतं.