कोल्हापुरात पुराने हाहाकार : नौसेना-कोस्टगार्डचे पथक दाखल, ५१ हजार लोकांचे स्थलांतर

पावसाचा पुन्हा जोर वाढल्याने कोल्हापूरमधील पूरस्थिती अधिकच बिकट झाली आहे. 

Updated: Aug 7, 2019, 01:41 PM IST
कोल्हापुरात पुराने हाहाकार : नौसेना-कोस्टगार्डचे पथक दाखल, ५१ हजार लोकांचे स्थलांतर title=

कोल्हापूर : पावसाचा पुन्हा जोर वाढल्याने येथील पूरस्थिती अधिकच बिकट झाली आहे. नौसेना, कोस्टगार्डची तातडीने मदत घेण्यात येत आहे. पुरामुळे हाहाकार माजला आहे. अनेक लोक बाधित झाले आहेत. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बंद केल्यामुळे पाणी कमी होण्यास मदत होईल, अशी शक्यता होती. मात्र पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे. त्यामुळे मदतकार्य करण्यासाठी लष्कर दाखल झाले असून लोकांना वाचवण्याचे काम सुरु झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या २०४ गावातून ११ हजार ४३२ कुटुंबांतल्या ५१ हजार ७८५ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे.

नौसेनेच्या दोन विमानातून २२ जणांचे पथक कोल्हापुरात दाखल झाले असून गोवा कोस्टगार्डचे हेलीकॉप्टर एअरलिफ्टींगसाठी दाखल झाले आहे, अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. रात्री लष्कराचे एक पथक दोन बोटीसह तसेच एनडीआरएफचे आणखी एक पथक चार बोटींसह शहरात दाखल झाले. महामार्गावर जास्त पाणी असल्याने अडचण निर्माण झाली. पहाटेपासूनच प्रयाग चिखलीकडे चार बोटींसह पथक रवाना झाले आहे. तर शहरासाठी दोन बोटींसह मदत सुरु झाली आहे.

कोल्हापुरात पूरस्थिती गंभीर, हजारो नागरिकांचे स्थलांतर

नौसेनेने आज पुन्हा १४ बोटी देण्याचे मान्य केले आहे. प्रशासनाकडून प्राधान्याने प्रयाग-चिखलीकडे मदत पाठविण्यात आली आहे. आवश्यक त्या ठिकाणी एअरलिफ्टींग केले जाणार आहे.  आवश्यकतेनुसार पूरग्रस्तांना जिवनाश्यक वस्तू विशेषत: अन्नाची पाकीटे देण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली आहे.