रायगडात पावसाचा जोर कमी, पूरस्थिती नियंत्रणात

अतिवृष्‍टीमुळे महाड आणि परीसरात निर्माण झालेली पूरस्थिती नियंत्रणात आली आहे.  

Updated: Aug 7, 2019, 10:45 AM IST
रायगडात पावसाचा जोर कमी, पूरस्थिती नियंत्रणात title=
संग्रहित छाया

रायगड : अतिवृष्‍टीमुळे महाड आणि परीसरात निर्माण झालेली पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी सावित्री आणि गांधारी या दोन्‍ही नद्यांचे पाणी धोका पातळीवरून वहात आहे. त्‍यामुळे महाड शहराच्‍या काही भागात अजूनही पूराचे पाणी आहे. रात्री एनडीआरएफ, महाड नगरपालिकेचे बचाव पथक आणि स्‍वयंसेवी संस्‍थांनी महाड, बिरवाडी आसनपोई या भगातून जवळपास २०० नागरीकांना पूराच्‍या पाण्‍यातून सुरक्षित स्‍थळी हलवले आहे. 

या पुरात कोणतीही जीवीतहानी झाली नसली तरी मोठया प्रमाणात वित्‍तहानी झाली आहे. पूरस्थिती कमी झाली असली तरी खबरदारी म्‍हणून महाडमध्‍ये एनडीआरएफ, लष्‍कर, तटरक्षक दल तैनात ठेवण्‍यात आले आहे. दक्षिण रायगडातील महाड, पोलादपूर, माणगाव तळा या तालुक्‍यातील शाळा महाविद्यालयांना सुटी देण्‍यात आली आहे. 

रोहा तालुक्यातील भालगाव रस्त्यावर दरड कोसळली आहे. मातीचा ढिगारा रस्त्यावर आला असल्याने रोहा, मुरुड, तळाकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. दरड कोसळली त्यावेळी रस्त्यावर कोणतेही वाहन नसल्याने कोणतीही मोठी दुर्घटना टळली. डोंगराचा भाग कोसळल्याने मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर आला. पोलीस आणि बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दरड काढण्याचं काम सुरू आहे. मात्र वाहतूक सुरू होण्यास काही तासांचा कालावधी लागणार आहे.