पुणे : शहरातील चंदननगरमधील आनंदपार्कमध्ये एका महिलेची गोळी मारुन हत्या करण्यात आली आहे. इंद्रायणी सोसायटीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. अनुजा भाटी असं मृत महिलेचं नाव आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरून येऊन गोळ्या झाडल्याचं स्पष्ट झालंय. मात्र हा हल्ला का करण्यात आला हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. दरम्यान, येवलेवाडी येथे गोळीबार करण्यात आलाय. सराफा दुकानावर दरोड्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आला. यात एकजण जखमी झाला. गोळीबार करुन दरोडेखोर फरार झाला आहे. ही दुपारी दोन वाजण्याच्या सुमारासची घटना आहे.
अनुजा भाटी यांचा वडगाव शेरी परिसरात कॅटरिंगचा व्यवसाय होता. इथल्या अनेक सॉफ्टवेयर कंपनीमध्ये त्या डबे पोहोचवायच्या. ही घटना घडली तेव्हा पती ब्रिजेश भाटी हे घरातच होते. मूळचे उत्तर प्रदेशमधील नोएडाचं असलेलं हे कुटुंब दोन वर्षांपासून पुण्यात व्यवसायासाठी राहत असल्याची माहिती आहे. सुरुवातीला पतीनेच गोळीबार केल्याची माहीती पुढे आली होती. त्यानंतर आता दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याची माहीती समोर आलीय. चंदननगर पोलीस तपास करत आहेत.
तर दुपारी पुणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर क्राईम ब्राँचच्या पोलीस निरीक्षकांवर गोळीबार करण्यात आला आहे. गजानन पवार (गुन्हे शाखा, युनिट दोन) असे या हल्ला झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. हल्लेखोरांनी पवार यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. पवार यांच्या पोटात गोळी लागली आहे. जखमी पवार यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, चंदननगरमध्ये बुधवारी सकाळी झालेल्या हत्येसंदर्भातील आरोपींना शोधण्यासाठी रेल्वे स्थानकावर आले असताना पवार यांच्यावर गोळीबार झाला. हत्येतील आरोपींनी गोळीबार केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.