शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातील 'जय जवान जय किसान' सहकारी साखर कारखाना हा गेल्या १२ वर्षांपासून बंद आहे. या कारखान्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे करोडो रुपयांचे कर्ज असल्यामुळे हा कारखाना बंद आहे. परिणामी चाकूर, अहमदपूर, उदगीर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. त्यामुळे जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना पुन्हा चालू करण्यासाठी एका जाहीर मेळाव्याचे आयोजन नळेगाव येथील कारखाना परिसरात घेण्यात आला.
भाजपचे नेते बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय, शेतकरी, कामगारानीं या जाहीर मेळाव्याचे आयोजन केले होते. या जाहीर मेळाव्याला अनेक राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी, शेतकरी, कारखान्यात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली होती. हा कारखाना सुरु करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने योग्य ते सहकार्य करावे. कारखान्यावरील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे कर्ज फेडून शेतकऱ्यांसाठी हा कारखाना सुरु करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. जर सरकारने जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना सुरु करण्यात दिरंगाई केली तर प्राणांतिक लढा उभारण्याची शपथ यावेळी घेण्यात आली.