सातारा : सातारा राजपथावर सकाळच्यावेळी शहराची लगबग सुरु असतानाच अचानक भर रस्त्यात दोन वळूंची झुंज झाली. जागा सापडेल तिकडे ते सैरावैरा धावत होते.
अधूनमधून ते रस्त्यावर येत असल्याने वाहतूकही विस्कळीत होत होती. काही तरुण काठीच्या साह्याने झुंज सोडविण्याचा प्रयत्न करत होते; पण प्रयत्न निष्फळ ठरले. त्यातील एक वळू फूटपाथवरून सात फूट खोल बेसमेंटमध्ये पडला. त्यामुळे एका वळूने रस्त्याकडेच्या गाड्या पाडल्या. दरम्यानच्या काळात खाली पडलेला वळूही पाय-यांवरून वर आला आणि पुन्हा त्यांच्यामध्ये झुंज लागली.
अचानक घडलेल्या या प्रकाराने राजपथावर सर्वांचीच पळापळ सुरू झाली. हा थरार पाहण्यासाठी बघ्याचीही गर्दी झाली. तब्बल दोन तास ही झुंज सुरु होती. अखेर मस्तवाल वळूंची झुंज मिटविण्यात सातारकरांना पुढाकार घ्यावा लागला. जमावाने शिट्ट्या वाजवून, आरडाओरड केल्यानंतर ते दोन्ही वळू घाबरून पळून गेले आणि अखेर ही झुंज सुटली. अनेकांनी हा थरार आपल्या कॅमेरात कैद केला.