Maharashtra Budget Session : राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्येला तोंड द्यावं लागतंय. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं जगणं मुश्कील झालं आहे. 'पुन्हा शेतकऱ्याच्या पोटी जन्माला येणार नाही', असं म्हणत सोलापूरातल्या एका तरुण शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं आहे.
सोलापूरातल्या मगरवाडी इथं सुरज जाधव नावाच्या एका शेतकऱ्याने चार मार्चला फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली. हा मुद्दा आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात उपस्थित केला. सूरज जाधवने आत्महत्येपूर्वी व्हिडिओ केला आहे त्यात त्याने म्हटलंय, मला पुन्हा शेतकरी म्हणून जन्म घ्यायचा नाहीए, कारण शेतकरी हा असमर्थ, दुबळा असतो. या सरकारला शेतकऱ्याची काळजी नाहीए, असं म्हणत त्याने शेतकरी धोरणाचा निषेध केला. आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केली.
यासंदर्भात आपण सूरज जाधवच्या कुटुंबियांशी चर्चा केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. सूरजच्या कुटुंबियांना सांगितलं, ज्यावेळेस पिकाला पाणी द्यायची वेळ आहे, अशा काळात त्याच्या शेती पंपाचं कनेक्शन कापण्यात आलं. आज आपण बघितलं पाहिजे की अशा प्रकारे एक शेतकरी आत्महत्या करतोय, अनेक शेतकरी आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत असं फडणवीस यांनी म्हटलंय.
या सरकारला झालंय काय? मागच्या अधिवेशात उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एक बिल भरलं असेल तरी आम्ही वीज कनेक्शन कापणार नाही, पण राज्याचे उर्जा मंत्री उपमुख्यमंत्र्यांचं ऐकायला तयार नाहीत, ते जाहीर घोषणा करतात वीज बिल भरलं नसेल तर आम्ही वीज कापू
ज्या पद्धतीने सुलतानी पद्धतीने शेतकऱ्याची वीज कापली जात आहे त्यामुळे एक सूरज जाधव पाहिला मिळतोय, पण अनेक सूरज जाधव सरकार तयार करतंय, अशी टीका फडणवीस यांनी सरकारवर केली.
या राज्यात शेतकऱ्याला फेसबूक लाईव्ह करुन आत्महत्या करण्याची वेळ या सरकारमुळे येतेय. सूरज जाधव प्रकरणातून सरकारने धडा घ्यावा, शेती पंपाची वीज कापण्याचं सत्र जे सरकारने सुरु केलं आहे ते तात्काळ थांबवावं. शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज कापण्याचं सत्र थांबावण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली.