राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी-गारपिटीचं थैमान, निसर्गापुढे बळीराजा हतबल

कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपीट अशा विविध संकटावर मात करुन शेतकरी शेत पिकवतो. मात्र निसर्गासमोर त्याचं काही चालत नाही. 

Updated: Jan 9, 2022, 09:52 PM IST
राज्यातील विविध जिल्ह्यात अवकाळी-गारपिटीचं थैमान, निसर्गापुढे बळीराजा हतबल title=

मुंबई : कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस तर कधी गारपीट अशा विविध संकटावर मात करुन शेतकरी शेत पिकवतो. मात्र निसर्गासमोर त्याचं काही चालत नाही. यंदाही शेतकऱ्यांची तीच अवस्था आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. त्यांचा आक्रोश काळीज पिळवटून टाकतोय. (farmers in various districts of maharashtra suffer huge losses due to unseasonal rains)

अनेक संकटांवर मात करत शेतकऱ्यांनी कष्टानं आपली शेती फुलवली खरी. पण पुन्हा एकदा निसर्गानं त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवलंय. सततच्या अवकाळी आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचं असं अतोनात नुकसान होतंय. पुन्हा एकदा हा दुर्दैवाचा फेरा आलाय. अवकाळी आणि गारपिटीमुळे विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.  

अमरावती जिल्ह्यात रात्रभर पावसाची रिपरिप सुरु होती.  शेतात जिकडे पाहावं तिकडे पिकांऐवजी पाणीच पाणी दिसतंय. या पावसानं गहू, चणा पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. काढणीला आलेली तूरही भिजली आहे. शेतकऱ्यांसाठी पांढरं सोनं असलेला कापूस यंदा चार पैसे देईल अशी अपेक्षा होती. मात्र पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झालाय. फळबागायतादारांची अवस्थाही वेगळी नाही.

वर्ध्यातील आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्याला अवकाळीनं झोडपून काढलं. अनेक भागात गारपिट झालीये. याचा मोठा फटका कापूस, हरभरा, तूर, गहू पिकाला बसलाय. गव्हाची शेती पूर्णपणे जमीनदोस्त झालीय. तर  गारपिटीमुळे संत्र्याची फळं गळून पडली आहेत. 

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अवकाळीनं दोन हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. केळी, पपई, कांदा, हरभरा, मका, गहू, भाजीपाला या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. आता शेतकऱ्यांची सारी भिस्त सरकारी मदतीवर आहे. 

नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड, पिंपळगाव बसवंत, चांदवड तालक्यातील द्राक्ष बागांना पावसाचा मोठा फटका बसलाय. द्राक्ष मण्यांना तडे गेल्यानं 80 टक्के पिकांचं नुकसान झालंय. तर फुलो-यातही पाणी साचलंय.