शेतकऱ्यांचा लोकसंघर्ष मोर्चा मुंबईत दाखल

शासनाने शेतकऱ्यांना वाद सोडवण्याचं आश्वासन राज्य शासनानं दिलं, पण...

Updated: Nov 21, 2018, 12:16 PM IST
शेतकऱ्यांचा लोकसंघर्ष मोर्चा मुंबईत दाखल  title=

मुंबई : शेतात घाम गाळून आणि काबाड कष्ट करुन असंख्यजणांचा अन्नदाता असणारा शेतकरीच सध्या हवालदिल झाला आहे. जवळपास सहा महिन्यांपूर्वी करण्यात आलेल्या मागण्या आणि त्यानंतर राज्यशासनाकडून देण्यात आलेल्या आश्वासनांनतर बळीराजाच्या पदरी मात्र निराशाच आली आहे. त्यामुळे आपल्या प्रलंबित मागण्य़ा मान्य व्हाव्यात यासाठीच शेतकरी हजारोंच्या संख्येने मंगळवारी रात्रीच्या सुमारास ठाण्यात दाखल झाले. 

ठाण्यातून निघाल्यानंतर हा बळीराजा पायी प्रवास करकत सोमैय्या मैदानमार्गे आझाद मैदानात ठिय्या आंदोलनासाठी दाखल होत आहे. आपल्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. 

जवळपास २ लाख ३१ हजार ८५६ शेतकरी हे त्यांच्या मागण्या मान्य होण्याच्या प्रतिक्षेत असल्याचं म्हणत आतापर्यंत शासनाकडून फक्त अडीच टक्क्यांहूनही कमी मागण्यांकडे शासनाने लक्ष टाकल्याचं म्हटलं गेलं आहे. 

त्यामुळे सध्याच्या घडीला बळीराज्याच्या मनात शासनाविषयी असंतोष असल्याचं पाहायला मिळत आहे. 

दरम्यान, तीन हजाराहून अधिक शेतकरी कर्जमाफी आणि आदिवासी जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातल्या मागण्या घेऊन मुंबईच्या दिशेनं चालत निघाले आहेत. 

राज्यात दुष्काळग्रस्त भागात चाऱ्यासंदर्भातली आश्वासनं सरकारनं पाळलेली नाहीत. त्याविरोधातही मोर्चातून शेतकऱ्यांनी आवाज उठवलाय. राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी मोर्चात सहभागी झाले आहेत. 

आदिवासींच्या  जमिन मालकीहक्कासंदर्भातले वाद लवकरच सोडवण्याचं आश्वासन राज्य सरकारनं दिलं होतं. पण आतापर्यंत फक्त २ टक्के वादांवर तोडगा निघाल्याचा मोर्चेकऱ्यांचा आरोप आहे. सरकारनं ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्याची घोषणा केली. प्रत्यक्षात फक्त १४ हजार कोटी रुपयांचीच कर्जमाफी झाली. त्यामुळे अनेक शेतकरी अजूनही कर्जमाफीच्या लाभापासून वंचित असल्याचं मोर्चेकऱ्यांनी म्हटलं आहे.