अती उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा 'रेड अलर्ट' जारी

राज्यात सध्या तापमान वाढल्याने लोक हैरान झाले आहेत. उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  

Updated: Apr 30, 2019, 05:11 PM IST
अती उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा 'रेड अलर्ट' जारी title=

नागपूर : राज्यात सध्या तापमान वाढल्याने लोक हैरान झाले आहेत. उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुढील दोन दिवस विदर्भात अती उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे विदर्भातील ६ जिल्ह्यांकरिता हवामान खात्याने 'रेड अलर्ट' जारी केला आहे. अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांकरिता हवामान खात्याने 'रेड अलर्ट' जारी केला आहे.

का दिला जातो 'रेड अलर्ट'?

एखाद्या ठिकाणचे तापमान सतत दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी ४७ अंश सेल्सियसवर कायम असेल तर त्या ठिकाणी 'रेड अलर्ट' जारी करण्यात येतो. 'रेड अलर्ट'चा इशारा हवामान खात्याने दिल्यावर स्थानिक प्रशासनाने त्या अनुषंगाने खबरदारीच्या उपाययोजना करणे आवश्यक असतात. उष्माघातापासून बचावासाठी मे महिन्यात शासकीय, अशासकीय, खासगी शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

शाळा, महाविद्यालयांना सुट्टी द्या!

अतिरिक्त वर्ग किंवा परीक्षा घेण्याची आवश्यकता असल्यास सकाळच्या सत्रात सकाळी ११ वाजेपर्यंतच शाळा व महाविद्यालये सुरु ठेवावीत असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. विदर्भातील ६  शहरांचे तापमान हे ४६ अंशावर असल्याने या ठिकाणी दोन दिवसांसाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे त्यांनतर एक दिवसासाठी ऑरेंज आणि एक दिवसासाठी यलो अलर्ट आहे. 

यानंतर तापमानात होईल घट!

बंगालच्या खाडीवर चक्रीवादळ तयार झाल्याने हवेत आर्दता येईल आणि तापमान कमी होणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे, अशी माहिती नागपूर प्रादेशिक वेधशाळेचे उपमहानिरीक्षक एम. एल. साहू यांनी दिली.