मुंबई: मुकेश अंबानीच्या घराजवळ सापडलेल्या संशयित कार आणि त्यातील स्फोटकं प्रकरणी आता मोठी अपडेट येत आहे. या स्फोटक प्रकरणाचा आणि हिरेन मनसुखच्या मृत्यूचा तपास NIAकडे जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा तपास एनआयएकडे जाणार असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
मुंब्रा इथे शुक्रवारी दुपारी हिरेन मनसुख यांचा मृतदेह सापडला आहे. ते दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली होती. अंबानींच्या घराजवळ सापडलेली संशयित कार हिरेन मनसुख यांच्या नावावर आहे. तर दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे हिरेन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लेखी तक्रार दिल्याचं पत्रही समोर आलं आहे.
हिरेन यांचा मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबियांनी नकार दिला आहे. याचं कारण म्हणजे शवविच्छेदन अहवाल सर्वांसमोर आणा त्यानंतरच मृतदेह ताब्यात घेऊ अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे.
मनसुख हिरेन यांच्या घरी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे आणि त्यांची टीम पोहचली आहे. हिरेन यांच्या शरीरावर कोणतीही जखम किंवा मारहाणीची खुण नसल्याची ठाणे पोलिसांनी माहिती दिली आहे.