एकनाथ खडसेंच्या समर्थकाला भर रस्त्यात चोप; खडसेंनी दिले स्पष्टीकरण

एकनाथ खडसे यांच्या समर्थकाला रस्त्यावर महिलांकडून बेदम मारहाण करण्यात आली

Updated: Jul 22, 2022, 11:03 PM IST
एकनाथ खडसेंच्या समर्थकाला भर रस्त्यात चोप; खडसेंनी दिले स्पष्टीकरण title=

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव :  जळगावच्या (Jalgaon) मुक्ताईनगरमध्ये एका तरुणीचा फोटो फेसबुकवर (Facebook) व्हायरल झाल्यानंतर एका नगरसेविकेच्या मुलाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणीने तिच्या आईसह फोटो व्हायरल करणाऱ्या नगरसेविकेच्या पुत्राला भररस्त्यात चांगलाच चोप दिला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

त्यानंतर मारहाण झालेली व्यक्ती ही राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. अनिम खान असे या नगरसेविकेच्या पुत्राचे नाव आहे. यावरुन मुक्ताईनगरात चांगलेच वातावरण तापले आहे.
या घटनेच्या निषेधार्थ एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadase) यांच्यासह खडसे समर्थकांनी पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलनाला केले.

दरम्यान, आता एकनाथ खडसे (Eknath Khadase)  यांनी स्वतः याबाबत  स्पष्टीकरण दिले आहे. व्हायरल झालेला फोटो हा अश्लिल नाही. तसेच ज्याला मारहाण करण्यात आली त्याने आलेला फोटो फॉरवर्ड केला होता असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

"व्हायरल झालेला फोटो हा अश्लिल नाही. एका व्यक्तीसोबत एक मुलगी बसली आहे आणि त्याच्या खाली फक्त काय झाडी काय डोंगर असे लिहीले आहे. त्यामध्ये कोणतीही अश्लिलता नव्हती. जर काही असेल तर पोलीस तपासतील. पण ज्याला मारहाण करण्यात आली त्याने आलेला फोटो फॉरवर्ड केला. त्या फोटोमध्ये काहीही अश्लिल नाही. साध्या फोटोमध्ये त्यांना अश्लिलता का दिसावी?" असे एकनाथ खडसे म्हणाले.

 "ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. रोहिणी खडसेंवर ज्यांनी हल्ला केला तेच या मारहाणीमध्ये सामील होते. पोलीस त्यांना अटक करत नसून त्यांना राजकीय संरक्षण मिळत आहेत. मुक्ताईनगरमध्ये पोलिसांमध्ये कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. पोलीस इतके हतबल का झाले?" असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला आहे.