प्रविण दांडेकर / गोंदिया : School Exam Copy in Gondia : सध्या दहावीच्या परीक्षा सुरु आहेत. मात्र, या परीक्षेदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परीक्षेत कॉपी करण्यास मनाई असताना चक्क शाळा कर्मचारी विद्यार्थ्यांना करण्यास सहाय्य करत असल्याचे दिसून येत आहे. याचा व्हिडिओ एका पालकांनेच तयार केला. आता संबंधितांवर काय कारवाई होणार, याकडे लक्षे लागले आहे.
हा सगळा प्रकार मोरगांव अर्जुनीच्या बहुउद्देशीय शाळेत 10 परीक्षेच्यावेळी घडला. शाळा कर्मचारी कॉपी करण्यास सहाय्य करत असल्याचे पालकानेच मोबाईलच्या माध्यमातून शूटिंग करत उघड केले आहे. कोरोनानंतर तब्बल 2 वर्षांने सुरु झालेल्या 10 वी च्या परीक्षेला शाळेनेच गालबोट लावले आहे. गोंदिया जिल्ह्याच्या मोरगांव अर्जुनी येथील बहुउद्देशीय शाळेत 10 परीक्षेत चक्क कॉपीचा प्रकार सुरू असल्याचे उघड झाले आहे.
गणिताचा पेपर सुरु असतांना शाळा प्रशासनाने कॉपी करण्यासाठी यावेळी अनोखी शक्कल लढवत परीक्षा खोलीच्या बाजूला रिकाम्या खोलीत सर्व कॉपीचे साहित्य ठेवले होते. आवश्यकतेनुसार एक एक विद्यार्थी आपण कोणाला दिसू नये म्हणून खिडकीच्या खाली वाकून जाताना दिसून येतो. तसेच 'कॉपी'च्या सुरक्षितेसाठी एक कर्मचारीच नियुक्त केला होता, असा आरोप व्हिडिओ तयार करणाऱ्या पालकांनेच केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी गोंदिया शिक्षण विभागाकडे तक्रार करुन कोणतीही कारवाई केली गेली नाही, अशी माहिती पीडित पालकाने दिली आहे. त्यामुळे शाळेच्या या प्रकारामुळे अन्य प्रमाणिक विद्यार्थ्यांवर हा अन्याय आहे. त्यामुळे असे प्रकार रोखण्यासाठी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित पालकांने केली आहे.