चंद्रपुरातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजारांची तातडीची मदत

चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची तातडीची मदत देणार असल्याची घोषणा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. 

Updated: Sep 2, 2020, 09:03 AM IST
चंद्रपुरातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजारांची तातडीची मदत  title=
संग्रहित छाया

चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना प्रति कुटुंब दहा हजार रुपयांची तातडीची मदत देणार असल्याची घोषणा आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत पूरग्रस्तांच्या खात्यात  पैसे जमा केले जाणार आहेत. जिल्ह्यातील आठ ते नऊ हजार कुटुंबियांना ही मदत मिळणार आहे. त्यानंतर सर्व्हे करून पुर्णतः उध्वस्त झालेल्या घरांना ९५ हजार रुपये, घर दुरुस्तीसाठी ५० हजार रुपये आणि अंशतः पडझड झाली असेल तर १५ हजार रुपये दिले जाणार आहेत. 

पूरग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १८ हजारांची मदत देणार दिली जाणार आहे. धान, सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचा त्यात समावेश असेल. दरम्यान, भंडारा-गोंदिया जिल्ह्यातला पूर आता ओसरला आहे. नदीकाठच्या गाम्रस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. मात्र या पुरात घराचे झालेले नुकसान या ग्रामस्थांची चिंता वाढवत आहे.

भंडारा, गोंदिया जिल्ह्यात संततधार पावसामुळे तीन दिवस पूर परिस्थिती निर्माण झाली आणि शेकडो घरं पाण्याखाली गेली. घरचे सगळे उद्ध्वस्त झाल्याने दवडीपार गावातील २०० लोकांची जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडीत सोय करण्यात आली. तिथंही जागा नसल्याने काही गावकऱ्यांना आपल्या घराबाहेरच्या चिखलातच संसार मांडावा लागत आहे. चिमुकल्या मुलांना घराबाहेरच रात्र काढावी लागत आहे.

तर दुसरीकडे वैनगंगा नदीच्या महापुराचा मोठा फटका गडचिरोली जिल्ह्यात नदीकाठी असलेल्या गावांना बसलाय. चार दिवस संपूर्ण भातशेती पाण्याखाली असल्याने शेतकऱ्यांनी वर्षभर काय करायचे? असा प्रश्न निर्माण झालाय.  वडसा- आरमोरी- गडचिरोली या तालुक्यांना वैनगंगा नदीच्या रौद्र रुपाचा तडाखा बसला. घरे -शेती व जनावरे यांचं नुकसान झाले. 

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडसा तालुक्यातील सावंगी गावात पूरग्रस्तांशी संवाद साधला. जीवनावश्यक साहित्याचं वाटप केलं. पूर ओसरल्यानंतर पंचनामे करून पूरग्रस्तांना योग्य ती मदत दिली जाईल, अशी ग्वाही शिंदेंनी दिली.