मुंबई : कोरोना लॉकडाऊन काळात विद्युत बिले (Electricity Bill) भरण्यास सवलत देण्यात आली होती. तसेच वीजबिले माफ केली जातील, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, वीजबिले (Electricity Bill) माफ करण्यात आली नाहीत. त्यामुळे अनेक राजकीय नेते आणि पक्षांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र, ऊर्जामंत्र्यांनी आपला शब्द फिरवला. आता थकीत वीजबिलाच्या कारवाईबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.
वीजबिलावरुन रोहित पवार आक्रमक pic.twitter.com/FcfGfl95GC
— ZEE २४ तास (@zee24taasnews) January 21, 2021
वाढीव वीजबिलांबाबत शाहनिशा करण्याची गरज आहे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. वाढीव वीजबिल कमी करण्याबाबत किंवा प्रत्यक्ष जेवढा वापर झाला तेवढ्याच बिलाबाबत सरसकट धोरण आखता येईल का, याचा अभ्यास करायला हवा, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
कोरोनाकाळात वीजेचा अतिरिक्त वापर झाला असेल पण तो तीन ते चार पट नक्कीच झाला नसेल असं रोहित पवारांनी म्हटलंय. ग्राहकांना आलेल्या बीलाचा प्रत्यक्ष वापर कसा झाला याचा रिपोर्ट एमएसईबीने काढलाय का, असा सवाल त्यांनी विचारला आहे. याबाबत तसा रिपोर्ट काढण्याबाबत आदेश काढलेत का, असे त्यांनी विचारले आहे. सर्वसामान्य ग्राहकांचा आवाज ऊर्जा मंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे ते म्हणाले.