नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या वर्चस्वाला जबरदस्त धक्का

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातले नांदगाव आणि येवला हे दोन विधानसभा मतदारसंघ भुजबळांचे हक्काचे म्हणून ओळखले जातात

Updated: May 25, 2019, 10:24 AM IST
नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या वर्चस्वाला जबरदस्त धक्का  title=

योगेश खरे, झी २४ तास, नाशिक : नाशिकमध्ये हेमंत गोडसे आणि दिंडोरीमध्ये भारती पवार या दोन उमेदवारांनी नाशिकमध्ये युतीच्या विजयाचा झेंडा रोवला आणि भुजबळांच्या वर्चस्वाला धक्का दिला. या लोकसभा निवडणुकीनंतर भुजबळांची नाशिकवरची सद्दी संपली, यावर शिक्कामोर्तब झालंय. नाशिक जिल्हा आणि शहर कधीकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. इथे भुजबळ कुटुंबीयांचं निर्विवाद वर्चस्व होतं. नाशिकमधल्या पूर्व नाशिक, मध्य नाशिक, पश्चिम नाशिक आणि देवळाली या चार विधानसभा मतदारसंघात भुजबळांना निव्वळ ५० टक्के मतं मिळाली आहेत. 

दुसरीकडे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातले नांदगाव आणि येवला हे दोन विधानसभा मतदारसंघ भुजबळांचे हक्काचे म्हणून ओळखले जातात. या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपाच्या भारती पवारांना मताधिक्य मिळालंय. नांदगाव आणि येवल्यातला पाणीप्रश्न कायम आहे. त्यामुळे येवला आणि नांदगावमध्ये भुजबळांना पुन्हा निवडून येणंही कठीण झालंय.  

याच नाशिकमध्ये भुजबळांचं वर्चस्व होतं आणि भुजबळ फार्महाऊसही दिमाखात उभं होतं. पण आता हेच नाशिक भुजबळांसाठी गोडाऊन होणार की काय? अशी चिन्हं आहेत.