हेल्मेट सक्ती : पोलीस कर्मचाऱ्याने दुचाकी चालकाच्या डोक्यात दंडुका घातला!

नाशिक शहरात हेल्मेट सक्तीची मोहीम सुरू असतांना पोलीस कर्मचाऱ्याने दुचाकी चालकाच्या डोक्यात दंडुका मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Updated: May 24, 2019, 10:28 PM IST
हेल्मेट सक्ती : पोलीस कर्मचाऱ्याने दुचाकी चालकाच्या डोक्यात दंडुका घातला! title=

नाशिक : शहरात हेल्मेट सक्तीची मोहीम सुरू असतांना पोलीस कर्मचाऱ्याने दुचाकी चालकाच्या डोक्यात दंडुका मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नाशिकच्या नाशिकरोड परिसरात हेल्मेट सक्तीची कारवाई सुरू असतांना सिन्नर फाट्यावर दुचाकीवर दोघे भाऊ आले. त्यावेळी हेलमेट नसल्याने त्यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी मात्र पोलीस कर्मचाऱ्याने हातातील दंडुका फिरवला आणि एका तरुणाच्या डोक्याला लागला. यामध्ये १९ वर्षीय शुभम महाले नावाचा तरुण जखमी झाला. त्याची प्रकृती स्थिर असून या घटनेने जखमीच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या या करवाईवर रोष व्यक्त केलाय.

घटना घडल्यानंतर नाशिकरोड पोलिसांकडे घटनेची तक्रार दाखल करण्यासाठी गेले. त्यावेळी पोलिसांनीही तक्रार घेण्यास टाळाटळ केली, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलिसांनी याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनी तर असा प्रकार घडलाच नसून चौकशी करू असे म्हणत घटनेवर पडदा टाकण्याचे काम केले आहे. या घटनेने शहरात सुरू असलेल्या हेल्मेट सक्तीच्या रोषात आणखी भर पडली आहे. दरम्यान, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस मात्र बोलणं टाळत आहेत. त्यामुळे आता वरिष्ठांनी या प्रकरणाकडे लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी होत आहे.