ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी आणि ठाणे या तिन्ही लोकसभा मतदार संघात 62 लाख 25 हजार 194 मतदार 29 एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी 6 हजार 715 मतदान केंद्रांसह 13 हजार 450 बॅलेट युनिट, 8 हजार 033 कंट्रोल युनिट आणि 8 हजार 700 व्हिव्हिपॅट मशिन आणि अधिकारी कार्मचारी सज्ज असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. तसेच यंदाच्या वर्षी मतदान केंद्रावर महिला, पुरुष यांच्यासह दिव्यांग, जेष्ठ नागरीक यांच्यासाठी तिसरी रांगेची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे देखिल त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात शनिवारी निवडणूकीसाठी करण्यात आलेल्या तयारीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमानी आदी उपस्थित होते.
ठाणे जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीसाठी 29 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यावेळी जिल्ह्यातील 6 हजार 635 दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर त्यांची कोणतीही गौरसोय होवू नये याकरीता, मतदान केंद्रावर 1 हजार व्हिलचेअर, डोली तसेच मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी रिक्षा व विशेष मार्गावर लोअर फलोअर बसेस आदींची व्यवस्था करण्यात आल्याचे नार्वेकर यांनी यावेळी सांगितले. तसेच दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर रॅम्प, पिण्याचे पाणी, आवश्यक टेबल खुर्ची, व इतर साहित्य, विद्युत पुरवठा आदी बाबींची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदान केंद्रावर जाण्यासाठी व मतदान साहित्य मतदानकेंद्रावर पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये 1 हजार 262, जीप 1 हजार 370, 30 टेम्पो ट्रव्हल्स, 45 ट्रक व 265 कार- रिक्षा अशा 2 हजार 972 वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच 18 विधानसभा मतदार संघामध्ये प्रत्येकी षक याप्रमाणे 18 सखी मतदानकेंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे.
लोकसभा निवडणूक 2019 च्या अनुषंगाने जिल्ह्यात सोमवार 29 तारखेला मतदान होणार आहे. तर मतमोजणी गुरुवार23 मे 2019 रोजी सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे. जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदार संघांचे मतमोजणी केंद्रही निश्चित करण्यात आले आहे. त्यात 23- भिवंडीः- महावीर फाऊंडेशनचे प्रेसिडेन्सी स्कूल; एलकुंडे ता. भिवंडी, 24- कल्याणः- ह.भ. प सावळाराम महाराज क्रीडा संकूल, जलतरण तलाव कार्यालय, डोंबिवली पूर्व, 25- ठाणेः- न्यू होरयझन स्कॉलर्स स्कूल; पहिला मजला, आनंद नगर, घोडबंदर रोड, कावेसर, ठाणे (पश्चिम) ठिकाणी मतमोजणी होणार आहे.