मला पक्ष सोडायचा नव्हता, सोडण्यास भाग पाडलं - एकनाथ खडसे

भाजपसोडून एकनाथ खडसे उद्या राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत दाखल होण्यासाठी

Updated: Oct 22, 2020, 03:42 PM IST
मला पक्ष सोडायचा नव्हता, सोडण्यास भाग पाडलं - एकनाथ खडसे title=

मुंबई : भाजपसोडून एकनाथ खडसे उद्या राष्ट्रवादीत दाखल होणार आहेत. एकनाथ खडसे राष्ट्रवादीत दाखल होण्यासाठी मुंबईकडे रवाना होण्याआधी त्यांनी 'झी २४ तास'शी चर्चा केली. यात त्यांनी मागील अनेक वादांवर भाष्य केलं. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी आरोप करणाऱ्यांना कशी अप्रत्यक्ष मदत केली हे सांगितलं आहे.

मंत्रिपदाचा मी स्वतः राजीनामा दिला नव्हता, माझा काय गुन्हा आहे असं मी स्वतः पक्षाला विचारलं. त्यावर तीन महिन्यांनंतर पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ, असं मला सांगण्यात आलं. त्यावेळी पार्टीचा आदेश मान्य करत मी राजीनामा दिला असं एकनाथ खडसे यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितलं.

आरोप करणाऱ्यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अप्रत्यक्ष मदत करत होते असा आरोप एकनाथ खडसे यांनी केलाय. झोटींग समितीच्या न्यायमूर्तींनाही फडणवीसांच्या कार्यालयातूनच फोन जात असल्याचं समजलं असंही खडसे म्हणाले. आपल्याला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात फडणवीसांनी अडकवल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय. त्यामुळेच पक्ष सोडला असं खडसे यांनी म्हटलंय. 

भाजपमध्ये कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. अनेक जण पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच दोन महिन्यात सरकार येईल अशी खोटी आशा दाखवावी लागत आहे अशी टीका खडसेंनी केली. गेल्या ११ महिन्यात सरकारचा केसही वाकडा झाला नाही. भाजपला हे सरकार पाडणं शक्य नाही असं खडसे म्हणाले.