जळगाव : भाजपला रामराम ठोकल्यानंतर आता एकनाथ खडसे हे मुंबईकडे रवाना झाले आहेत. उद्या म्हणजेच शुक्रवारी दुपारी 2 वाजता त्यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे हे भाजपवर नाराज होते. राष्ट्रवादीत जाणार म्हणून गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. अखेर काल जयंत पाटील यांनी यावर शिक्कामोर्तब केला. शुक्रवारी खडसे हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली होती.
मुंबईकडे रवाना होत असताना खडसे यांचे अनेक समर्थक यावेळी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी घोषणा देत यावेळी खडसे यांना पाठिंबा दर्शवला.
एकनाथ खडसे यांच्या येण्याने राष्ट्रवादीचे बळ वाढेल. भाजपमध्ये होणारा अन्याय लोकांनी पाहिला आहे. हळूहळू आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होईल. खडसेंबरोबर येण्याची अनेकांची इच्छा आहे. आम्ही त्यांना टप्पाटप्प्याने प्रवेश देणार आहोत. असं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
खडसेंना काय द्यायचे याची चर्चा झालेली नाही, शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ते पक्षात येत असल्याचं देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.