दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांवर परीक्षा काळात ताण येऊ नये म्हणून महामंडळातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

आकाश नेटके | Updated: Aug 28, 2023, 03:45 PM IST
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर title=

Maharashtra State Bord Exam : राज्य शिक्षण मंडळातर्फे दहावी-बारावीच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. संभाव्य वेळापत्रकानुसार बारावीची (12th Exam) परीक्षा 21 फेब्रुवारी ते 23 मार्च या कालावधीत होणार आहे. तर दहावीची (10th Exam) परीक्षा 1 ते 22 मार्च या कालावधीत होणार आहे. यासोबतच राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यात बारावीचा निकाल 32.13 टक्के, तर दहावीचा निकाल 29.86 टक्के लागला आहे.

राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या काळातील ताण कमी करण्यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी परीक्षांचे संभाव्य सविस्तर वेळापत्रक हे http://www.mahasscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वेळापत्रकाबाबत काही हरकती-सूचना असल्यास त्या `15 दिवसांत विभागीय मंडळ, राज्य मंडळाकडे लेखी स्वरुपात सादर करण्याच्या देखील सूचना करण्यात आल्या आहेत.

मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा या प्रचलित पद्धतीनेच होणार आहे. हे संभाव्य वेळापत्रक केवळ विद्यार्थ्यांच्या माहितीसाठीच आहे. त्यामुळे परीक्षेपूर्वी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे. प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचेही बोर्डाकरुन स्पष्ट करण्यात आले आहे.

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर

यासोबत राज्य शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक यांनी या निकालाची माहिती दिली. राज्य मंडळाने जुलै-ऑगस्टमध्ये दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा घेतली होती. बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 70 हजार 205 विद्यार्थ्यांपैकी 68 हजार 909 विद्यार्थ्यांपैकी 22 हजार 144 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यात विज्ञान शाखेतील 14 हजार 632, कला शाखेतील 4 हजार 146, वाणिज्य शाखेतील 3 हजार 28, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या 286 आणि आयटीआयच्या 52 विद्यार्थ्यांचा समावेश होता. 

तर दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी बसलेलल्या 49 हजार 377 विद्यार्थ्यांपैकी 45 हजार 166 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 13 हजार 487 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.