'तुम्ही कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ करुन...'; ED च्या कारवाईनंतर रोहित पवारांचं अजित पवारांना चॅलेंज

Rohit Pawar Slams Ajit Pawar After ED Action: रोहित पवारांच्या मालकीच्या कंपनीचा ताबा असलेली 161.30 एकर जमीन, प्लॅण्ट, मशिन्स, साखर युनिटची इमारत ईडीने जप्त केली आहे. या जप्तीनंतर रोहित पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 9, 2024, 02:37 PM IST
'तुम्ही कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ करुन...'; ED च्या कारवाईनंतर रोहित पवारांचं अजित पवारांना चॅलेंज title=
सोशल मीडियावरुन रोहित पवारांनी साधला निशाणा

Rohit Pawar Slams Ajit Pawar After ED Action: महाराष्ट्र राज्य सरकारी बँकेच्या (एमएससीबी) कथित गैरव्यवहार प्रकरणामध्ये सक्तवसुली संचालनालयाने म्हणजेच 'ईडी'ने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. रोहित पवारांच्या मालकीच्या 'बारामती अॅग्रो' कंपनीशी संबंधित 50 कोटी 20 लाख रुपयांच्या मालमत्तेवर शुक्रवारी टाच आणली. दरम्यान याच वेळी अजित पवार गटाचे सर्वेसर्वा अजित पवार हे लोकसभेच्या वाटाघाटीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांबरोबरच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबर दिल्ली दौऱ्यावर होते. सदर कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी रोहित पवारांनी अजित पवारांवर थेट नाव न घेता निशाणा साधला आहे.

भाजपामध्ये प्रवेश करावा का?

ईडीने जप्तीची कारवाई केलेल्या मालमत्तेमध्ये बारामती अॅग्रोशी संबंधित कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या मालमत्तांचा समावेश आहे. या कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया देताना रोहित पवारांनी साखर कारखान्यांवर कारवाई झाल्याने मला भाजपामध्ये प्रवेश करायला हवा का? असा विचार मानात आला. मात्र मी रडणारा आणि झुकणारा नेता नाही हे भाजपाने लक्षात ठेवावे, माझ्याविरोधात सलग दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली. माझ्याचविरोधात कारवाई का केली जाते? असा सवाल रोहित पवारांनी विचारला.

माझा संघर्ष जगजाहीर आहे पण तुम्ही...

या कारवाईच्या दुसऱ्या दिवशी रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांवर निशाणा साधला. "युवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तळमळीतून एका ‘बच्चा’ने 800 कि.मी. ची पायी संघर्षयात्रा काढली त्यावेळी ‘यांनी काय संघर्ष केला’ अशी टीका काहींनी केली. त्यांना सांगायचंय की, बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक वेगाने भूमिका बदलत द्वेष पसरवणाऱ्या ‘मित्रा’बरोबर जाऊन सत्तेचं संरक्षण घेतल्यानंतर तुम्हाला अशी टीका करायला सुचते, पण माझा संघर्ष जगजाहीर आहे आणि व्यवसाय कसा उभा केला हे सांगण्याचं धाडसही माझ्यात आहे," असं रोहित पवारांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना रोहित पवारांनी अजित पवारांचा थेट उल्लेख न करता संचित घोटाळ्याचा संदर्भ देत टोला लगावला आहे. "पण तुम्ही कोणता संघर्ष करुन आणि कोणत्या ‘धरणा’तून ‘सिंचन’ करुन साम्राज्य उभं केलं, हे सांगण्याची हिंमत तुमच्याच आहे का?" असा सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिलं आहे.

नक्की वाचा >> 'माझं ठाम मत आहे की आतून सगळे..'; दोन्ही पवारांचा उल्लेख करत राज ठाकरेंचं विधान

जागांसाठी दिल्लीवाऱ्या पण महाराष्ट्राच्या प्रश्नांवर आवाज उठवला नाही

"माझ्यावरील कारवाईवरून आज तुम्हाला व तुमच्या नवीन मित्राला गुदगुल्या होत असतील पण लोकसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याची झलक आत्ताच जागावाटपातही दिसायला लागलीय. हव्या त्या मंत्रीपदासाठी आणि तिकीटासाठी तुम्ही 100 दिल्लीवाऱ्या कराल, पण महाराष्ट्राच्या प्रश्नांवर कधी दिल्लीत आवाज उठवलेला ऐकला नाही," असा टोलाही रोहित पवारांनी लगावला आहे.

ईडीने काय काय जप्त केलं?

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील 161.30 एकर जमीन, प्लॅण्ट, मशिन्स, साखर युनिटची इमारत ईडीने जप्त केली आहे. संशयास्पद व्यवहाराद्वारे रोहित पवारांच्या कंपनीने अन्य कंपन्यांच्या संगममताने तोट्यात गेलेले कारखाने विकत घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.