मयुर निकम, झी मीडिया, बुलडाणा : संपूर्ण राज्याचे लक्ष भेंडवळच्या भविष्यवाणीकडे लागलेले असते. त्याच कारण म्हणजे या भविष्यवाणीमध्ये पीकपाणी, पाऊस, रोगराई, सत्तापालट अशा अनेक विषयांवर भाकित वर्तवली जातात. सुमारे 350 वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथे ही परंपरा जोपासली जाते. या भविष्यवाणीविषयी शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते.
बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ गावात अक्षय्य तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भविष्यवाणी वर्तवली जाते. म्हणून याला भेंडवळची भविष्यवाणी म्हणतात. हे भाकीत घट मांडणी करुन वर्तवली जातात. अक्षय्य तृतीयेला घटाची मांडणी होते. घट मांडणीचा मान वाघ घराण्याकडे आहे. ही परंपरा वाघ घराण्यातील चंद्रभान महाराज वाघ यांनी सुरु केली होती. अक्षय्य तृतीयेला सुर्यास्तापूर्वी वाघ घराण्याचे वंशज गावाबाहेर शेतात घटची मांडणी करतात.
घटामध्ये 18 धान्य असतात. यात गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, करडी मसूर, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा हे धान्य गोलाकार पद्धतीने मांडले जातात. घटाच्या मध्यभागी खोल खड्डा करुन पावसाळ्याच्या चार महिन्याचे प्रतिक असलेली चार मातीची ढेकळे त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवतात. घागरीवर पापड, भजी, वडा, सांडोळी, कुरडई, विड्याच्या पानावर सुपारी ठेवून प्रतिकात्मक मांडणी केली जाते. दुसऱ्या दिवशी या घटात झालेल्या बदलावरुन भाकीत वर्तवलं जातं.
पाऊस यंदा कसा असेल?
१. जून, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात यंदा चांगला पाऊस पडणार.
२. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस पडणार
पिकांसंदर्भात भविष्यवाणी काय सांगते?
१. देशात पीक चांगलं येईल.
२. ज्वारी, कापूस, उडीद, हरभरा पिकं चांगली येतील या पिकांना भाव मिळेल.
३. वटाणा, बाजरी, गहू ही पिके मध्यम स्वरुपात येतील.\
राजकीय भाकीत
१. सत्तापालट होणार नाही.
२. राजा कायम राहणार.
३. देश अर्थिक अडचणीत असेल
आरोग्य विषयक
मागचे काही दोन ते तीन वर्ष देशावर कोरोनाचं सावट आहे. मात्र, यंदाचं भाकीत समाधानकारक आहे. रोगराईचा नायनाट होईल असं भाकीत भेंडवळमध्ये वर्तवण्यात आलंय.