मुंबई : Drugs Case : अंमली पदार्थाच्या आडून राज्याच्या (Maharashtra) बदनामीचा (Defamation) डाव सुरु आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केले आहे. चार दिवसांपूर्वी महाराष्ट्र पोलिसांनी 25 कोटी रुपयांचे ‘हेरॉईन’ पकडले. पण एवढ्या मोठ्या पोलिसांच्या कामगिरीची कुठेही दखल घेतली गेली नाही. महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीला डावलण्याचा प्रयत्न होत असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. (Drugs Case : Made to seem drugs from whole world are in Maharashtra: CM Uddhav Thackeray)
औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या इमारत विस्तारीकरण कार्यक्रमाच्या लोकार्पणला ते उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरण रिजिजू आणि सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन व्ही रमणा या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, अंमली पदार्थांच्या आडून अशी वातावरणनिर्मिती करून महाराष्ट्राच्या ख्यातीला बदनाम करण्याचा हा डाव आहे. जगातील अमली पदार्थ जणू काही महाराष्ट्रातच तयार होत आहेत आणि ते पकडण्याची कामगिरी फक्त विशेष चमूच पार पाडू शकते, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.
यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले. सोबतच महाराष्ट्रात अमली पदार्थवरून तापलेल्या वातावरणावरही अप्रत्यक्ष भाष्य केले. अमली पदार्थाला सध्या मोठे पेव फुटले आहे आणि त्यावरून महाराष्ट्राला टार्गेट केले जात आहे. मात्र, हा महाराष्ट्र बोलघेवड्यांचे राज्य नाही. येथे जे बोलले जाते ते करूनही दाखवले जाते. अंमली पदार्थांच्या धाडीवरून विशेष चमूचे विशेष कौतुक होत आहे. कारण त्यात ‘हिरो’ होते आणि त्यामुळे या विशेष चमूलाही प्रसिद्धी मिळाली, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र पोलीस दल अधिक मजबूत आहे, तत्पर आहे. गुन्हेगारांना येथे दयामाया दाखवली जात नाही तर त्याला शिक्षेपर्यंत पोहोवले जाते. अशा महाराष्ट्र पोलिसांच्या कामगिरीला आणि महाराष्ट्राच्या ख्यातीला बदनाम करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि तो आपल्याला मोडून काढायचा आहे, असा इशारा मुख्यमंत्री यांनी यावेळी दिला.