महाराष्ट्रात पाणीटंचाईचं भीषण संकट; धरणांनी गाठला तळ, तब्बल 3500 टँकरने पाणीपुरवठा

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललंय. राज्यभरात जवळपास साडे तीन हजार टँकरने पाणी पुरवठा केला जातोय.

Updated: May 24, 2024, 07:51 PM IST
महाराष्ट्रात पाणीटंचाईचं भीषण संकट; धरणांनी गाठला तळ, तब्बल 3500 टँकरने पाणीपुरवठा title=

Maharashtra Drought : मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिवसेंदिवस परिस्थीती भीषण होत चाललीय.. राज्यातील वाड्यावस्त्यांमध्ये जवळपास 3 हजार 692 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. राज्यात पाणीबाणी निर्माण झाली आहे. राज्यातील जवळपास सर्वच जिल्हयाचा पाणीपुरवठा टँकर भरोसे झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. 

राज्यभरात टँकरेद्वारे पाणी पुरवठा

मराठवाडा्यात 1256 गावं आणि 506 वाड्यांना 1849 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.  पश्चिम महाराष्ट्र  631 गावं आणि 3829 वाड्यांना 755 टँकरने पाणीपुरवठा होत आहे.  उत्तर महाराष्ट्रात 756 गावं आणि 2570 वाड्यांना 812 टँकरनं पाणीपुरवठा केला जातोय.  कोकण विभागात देखील हेच चित्र आहे.  232 गावं आणि 766 वाड्यांना 177 टँकरनं पाणीपुरवठा केला जात आहे. अमरावती विभागात 87 गावांना 92 टँकरनं तर, नागपूर विभागात 11 गावांना 7 टँकरनं पाणीपुरवठा केला जात आहे. 

दुष्काळाबाबत शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता

सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसेल तर त्यांना जागं करण्याचे इतरही उपाय असल्याचं पवार म्हणालेत. दरम्यान शरद पवार यांनी सरकारला काही सुचनाही केल्या आहेत. राज्यात पाणीटंचाईचं संकट आहे. कर्जाच्या वसुलीला स्थगिती द्यावी.  वीजबील वसुलीला स्थगिती द्यावी. दुष्काळी भागातील नागरिकांचा वीज पुरवठा खंडित करू नका.  शालेय विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा अशा काही सूचना शरद पवार यांनी केल्या आहेत. 

राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती गंभीर झालीय. त्यामुळे तात्काळ मदत आणि उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथील करा अशी विनंती राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. महाराष्ट्रातील शेवटच्या 5 व्या टप्पाचं मतदान संपून तीन दिवस झालेत. लोकसभा निवडणुक आचारसंहिता शिथील झाल्यास राज्य सरकारच्या दुष्काळी उपाययोजनांना गती मिळणार आहे. राज्यातील जनतेला हंडाभर पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावं लागतंय.. वरर्षानुवर्षाची हीच स्थिती आहे.. यावर कायमस्वरुपी तोडगा कधी निघणार हाच खरा प्रश्न आहे.