नागपुरात पिण्याचे पाणी 'हिरवे'

पावसामध्ये मुंबईकरांना अनेकदा पिवळ्या पाण्याचा सामना करावा लागतो. पण आता चक्क मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात लोकांना हिरव्या रंगाच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 17, 2017, 05:48 PM IST
नागपुरात पिण्याचे पाणी 'हिरवे' title=

नागपूर : पावसामध्ये मुंबईकरांना अनेकदा पिवळ्या पाण्याचा सामना करावा लागतो. पण आता चक्क मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात लोकांना हिरव्या रंगाच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. 

नागपुरात अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. गढूळ पाणी पाहून प्रशासनही थक्क झाले आहे. या मुद्द्यावर मनपातील विरोधक संतापले. सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत त्यांनी शहराला स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. महापौर नंदा जिचकार यांनीही अद्याप नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपुरातील भगवाननगर व बँक कॉलनी तसेच इतर परिसरात काविळीची साथ पसरली आहे. या परिसरात काविळीचे जवळपास २५ रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधकांनी विरोधाचा पवित्रा हाती घेतला आहे. 

जूनमधील चांगल्या सुरुवातीनंतर नैऋत्य मोसमी पावसाने शेवटच्या आठवड्यापासून आजवर दडीमारली आहे. त्यामुळे कन्हान नदीच्या पाण्याचा रंग बदलला आहे. परिणामी पाण्याची गुणवत्ताही बदलली आहे. त्यामुळे पाणी हिरवेगार दिसत आहे. 'नीरी'च्या विशेषज्ज्ञानीही पाण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. जैविक वृद्धिमुळे पाण्याचा रंग बदलला असावा, असे निदान विशेषज्ज्ञांनी केले आहे.

शहरात आजारांची साथ वाढत असताना सत्ताधारी मात्र मजेत आहे. नागरिकांच्या दूषित पाण्याबद्दल असलेल्या तक्रारींवर तातडीने कुठल्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत. महापौर नंदा जिचकार यांनीही अद्याप नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली नसल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. अनेक भागांमध्ये विविध आजारांच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सत्ताधारी भाजप लोकांच्या मृत्यूची वाट बघत आहे का, असा आरोप विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी पत्रपरिषदेत केला.