मालेगावसह नांदगाव, चांदवड, सटाणा आणि देवळा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती

डिसेंबरपासूनच भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. 

Updated: Apr 4, 2019, 07:27 PM IST
मालेगावसह नांदगाव, चांदवड, सटाणा आणि देवळा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती title=

निलेश वाघ, मालेगाव : अत्यल्प पावसामुळे नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवत आहेत. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. विहिरींची पाणीपातळी खालावली आहे, जलस्त्रोत आटू लागले आहेत, पाण्याअभावी शेतात पीक नाही. गेल्या तीन वर्षांपासून मालेगावसह नांदगाव, चांदवड, सटाणा आणि देवळा तालुक्यासह पूर्व भागात अशीच दुष्काळी परिस्थिती आहे. यंदा तर डिसेंबरपासूनच भीषण पाणीटंचाई जाणवू लागली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत आहेत. शेती आणि पशूधनाला याचा सर्वाधिक फटका बसतो आहे. 

आपल्याकडील जमा पैसा खर्च करून शेतकऱ्याने पोटच्या लेकराप्रमाणे जपलेल्या जनावरांना चारा पुरवला. मात्र मार्चनंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. चारा पाण्याअभावी जनावरांचे हाल पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. सरकारी चारा छावण्या सुरू झाल्या नसल्याने शेतकरी जड अंतकरणाने आपली जनावरं जगवण्यासाठी गोशाळेत दाखल करणं पसंत करतो आहे. 

मालेगावच्या गोशाळेत सध्या बाराशेहून अधिक जनावरं दाखल झाली आहेत. मात्र गोशाळा संचालकांनाही जनावरं पोसणं जिकरीचं झालं आहे. समाजातल्या दानशूरांच्या मदतीने पशूधन वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भीषण चाराटंचाई असताना मे अखेरपर्यंत चारासाठा शिल्लक असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतो आहे. मात्र कॅमेऱ्यापुढे माहिती द्यायला कुणीही तयार नाही. राजकीय मंडळी लोकसभा निवडणुकीत दंग झाली आहेत. मात्र दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्याकडं आणि जनावरं पाहण्यासाठी त्यांना वेळ नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल.