हिंगोलीत वादळी वाऱ्यासह गारपीट, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीने नागरिकांना झोडपून काढले आहे. 

Updated: Apr 4, 2019, 07:25 PM IST
हिंगोलीत वादळी वाऱ्यासह गारपीट, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान title=
संग्रहित छाया

हिंगोली : जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीटीने नागरिकांना झोडपून काढले आहे. सकाळपासूनच हिंगोली जिल्ह्यात आभाळ दाटून आले आहे. संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीटही झाली. या वादळाचा शेतकऱ्यांच्या शेतातील हळद, पालेभाज्या आणि आंबा, पपईसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. सेनगाव तालुक्यातील कडोळी, गोरेगाव, सवना, सुरजखेडा,सावरखेडा, सेनगाव, सिरसम गोरेगाव, खानापूर, लाख आदी परिसरात वादळी वाऱ्यासह अर्धा तास गारपीट झाली. 

कडोळी येथे रमतेराम महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सप्ताह सुरू आहे. यासाठी उभारलेला मंडप वादळी वाऱ्यांमुळे मोडून पडला. औंढयापासून तर कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांत जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाले. लिंबाच्या आकाराची गारपीट झाली. यामुळे शेतात काढून ठेवलेल्या, शिजवलेल्या हळदीचे मोठे नुकसान झाले आहे. हिंगोली नांदेड महामार्गावर सावरखेडा ते खानापूर चित्ता या गावांदरम्यान, एक बाभळीचे झाड कोसळून वाहतूक दोन तास ठप्प होती.

हिंगोलीपर्यंत राज्यमहामार्ग चौपदरीकरणासाठी खोदून ठेवण्यात आला आहे. या महामार्गावर जोरदार पावसासह गारपीट झाल्याने या मार्गावर चिखल झाल्याने प्रवाशांना या चिखलाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. आधीच दुष्काळ आणि त्यात झालेल्या गारपिटीमुळे हातातोंडाशी आलेले नगदी पीक शेतकऱ्यांना गमवावी लागणार आहेत.