मुंबई : ज्येष्ठ समाजसवेक बाबा आमटे (Baba Amte) यांची नात आणि डॉ. विकास आमटे (Dr Vikas Amte) यांची मुलगी डॉ. शीतल आमटे (Dr Sheetal Amte) यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण देश हादरून गेला आहे. शीतल यांचा मृतदेह सोमवारी बाबा आमटे यांच्या समाधीच्या शेजारी दफन करण्यात आला. या घटनेबद्दल आमटे कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
डॉ. शीतल यांचे पार्थिव काल संध्याकाळी आनंदवनात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अंत्यदर्शनासाठी लोकांची मोठी गर्दी झाली होती. आमटे कुटुंबातील सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते. त्याचप्रमाणे करजगी कुटुंबिय देखील उपस्थित होते. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनीही तिथं गर्दी केली होती. वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी शीतल यांचे चुलत बंधू डॉ. दिगंत प्रकाश आमटे (Digant Amte) यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
'हे फारच धक्कादायक आहे. आम्ही याची कल्पना काहीच केली नव्हती. आम्ही आता सगळे शॉकमध्ये आहोत. प्रतिक्रिया देण्यासारखं काही राहिलंच नाही. आम्ही सगळे धक्यात आहोत,' अशी प्रतिक्रिया डॉ. दिगंत प्रकाश आमटेंनी दिली आहे.
डॉ. शीतल आमटे या आनंदवनच्या महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. त्या आणि त्यांचे पती गौतम करजगी यांचे आनंदवन प्रकल्पातच वास्तव्य होते. गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याची माहिती आमटे कुटुंबीयांनी नुकतीच दिली होती. या वादावर तोडगा काढण्याच्या उद्देशाने डॉ. विकास आणि डॉ. भारती आमटे हे हेमलकसा प्रकल्पात गेले होते. त्यावेळी शीतल या आपल्या खोलीत एकट्याच होत्या. त्याचवेळी हा प्रकार घडला.