Dombivli Crime: डोंबिवली हादरली! 21 वर्षीय तरुणाकडून वडिलांची हत्या; आधी डोक्यात दगडी जातं घातलं अन् नंतर...

Son Killed Father: वडिलांची हत्या केल्यानंतर या 21 वर्षीय तरुणाने स्वत: टिळक नगर पोलिसांना फोन करुन मी माझ्या वडिलांची हत्या केली आहे, असं सांगितलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या तरुणाला ताब्यात घेतलं.

Updated: Feb 23, 2023, 02:53 PM IST
Dombivli Crime: डोंबिवली हादरली! 21 वर्षीय तरुणाकडून वडिलांची हत्या; आधी डोक्यात दगडी जातं घातलं अन् नंतर... title=
Dombivli Crime

Dombivli Crime: डोंबिवलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या वडिलांची निर्घृणपणे हत्या केली आहे. वडिलांच्या आजरपणाला कंटाळून या तरुणाने वडिलांच्या डोक्यात दगडी जातं घातलं. त्यानंतर गळा चिरुन या तरुणीने आपल्या वडिलांची हत्या केली. हत्या करण्यात आल्यानंतर या आरोपीने स्वत: पोलिसांना फोन करुन गुन्ह्याची माहिती दिली. आरोपीचं नाव तेजस शिंदे असं असून तो केवळ 21 वर्षांचा आहे. मृत वडिलांचं नाव श्यामसुंदर शिंदे असं असून त्यांचं वय 68 वर्ष इतकं होतं. या घटनेमुळे डोंबिवलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

कोण होते श्यामसुंदर शिंदे?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्यामसुंदर शिंदे हे त्यांची पत्नी आणि मुलगा तेजससहीत डोंबिवलीतील खंबळपाडा येथील भोईरवाडीमध्ये राहत होते. तेजस हा महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. त्याचे वडील हे मुंबई महानगरपालिकेतील निवृत्त सुरक्षा रक्षक होते. मागील काही महिन्यांपासून श्यामसुंदर हे आजारी होते. आजारपणामुळे श्यामसुंदर यांची फार चिडचीड व्हायची. अनेकदा या चिडचिडेपणामुळे तेजस आणि श्यामसुंदर यांचा वाद व्हायचा. या वादामध्ये अनेकदा श्यामसुंदर यांची पत्नी मध्यस्थी करुन पती आणि मुलाचा वाद सोडवायची. मागील काही महिन्यांपासून शिंदे यांच्या घरात हाच दिनक्रम सुरु होता.

...अन् त्याने वडिलांची हत्या केली

श्यामसुंदर यांची पत्नी काही कामानिमित्त घराबाहेर गेल्या असताना तेजस आणि श्यामसुंदर यांचा वाद झाला. वादानंतर श्यामसुंदर झोपायला गेले. मात्र संतापलेल्या तेजसने आपल्या वडिलांवर हल्ला केला. खाटेवर झोपलेल्या वडिलांच्या डोक्यात तेजसनं दगडाचं जातं घातलं. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे श्यामसुंदर जागेवरच तडफडू लागले. मात्र वडिलांना तडफडताना पाहूनही तेजसचा राग शांत झाला नव्हता. तेजसने किचनमधून भाजी कापण्यासाठी वापरली जाणारी घरगुती वापराची सुरी आणली आणि तडफडत असलेल्या वडिलांच्या गळ्यावरुन फिरवली. श्यामसुंदर यांच्या गळ्यावर केलेल्या जखमेमुळे मोठ्याप्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. वडिलांच्या गळ्यातून रक्त येत असताना तेजस समोरच बसून होता. तडफडतच श्यामसुंदर यांनी मुलगा तेजससमोर प्राण सोडले.

स्वत: केला पोलिसांना फोन...

वडिलांचा देह समोर निपचित पडून असताना राग शांत झाल्यावर तेजसने टिळक नगर पोलीस स्टेशनला फोन करुन मी माझ्या वडिलांची हत्या केल्याचं सांगितलं. तेजसला टिळक नगर पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याने गुन्हा कबुल केला आहे. यानंतर तेजसला हत्येच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली.