'लोकमान्यां'च्या शाळेत कुत्र्यांची नसबंदी, नागरिकांचा आक्षेप

रत्नागिरी शहरातील लोकमान्य टिळक विद्यालयात होत असलेली कुत्र्यांची नसबंदी रत्नागिरी नगर पालिकेने ताबडतोब थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यानी दिलाय.

Updated: Dec 26, 2017, 09:47 PM IST
'लोकमान्यां'च्या शाळेत कुत्र्यांची नसबंदी, नागरिकांचा आक्षेप title=

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील लोकमान्य टिळक विद्यालयात होत असलेली कुत्र्यांची नसबंदी रत्नागिरी नगर पालिकेने ताबडतोब थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यानी दिलाय.

याबाबतचे निवेदनही रत्नागिरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष तसंच नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलंय. रत्नागिरी शहरात कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेता नागरिकांच्या तक्रारींमुळे नगरपरिषदेनं कुत्र्यांची नसबंदी करण्याचा निर्णय घेतलाय. 

एका संस्थेला हे काम देण्यात आलंय. मात्र हे काम लोकमान्य टिळक विद्यालय, शाळा क्र 2 मध्ये सुरु असल्याने अनेकांनी चीड व्यक्त केलीय. या शाळेला ऐतिहासिक महत्त्व आहे. सध्या ही शाळा धोकादायक असल्यानं बंद आहे. 

मात्र, याच शाळेत लोकमान्य टिळक यांनी शिक्षण घेतलंय. त्यामुळे या शाळेचं महत्त्व वेगळं आहे. याच शाळेला लोकमान्य टिळकांचं नाव देण्यात आलंय. मात्र, याच शाळेत गेले काही दिवस कुत्र्यांची नसबंदी सुरु आहे. त्यामुळे या शाळेत शिकलेले माजी विद्यार्थी आक्रमक झालेत. 

या माजी विद्यार्थ्यानी थेट नगर परिषदेवर धडक दिली. या शाळेची इमारत बांधून शाळा पुन्हा सुरु करावी आणि विद्यादानाचे पवित्र कार्य ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी सुरु असलेली कुत्र्यांची नसबंदी त्वरीत थांबवावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन नगराध्यक्ष तसेच नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलं.