विषारी साप तोंडात पकडून कुत्र्यानं पोलिसांचे प्राण वाचवले

 विषारी सापापासून पोलिसांचे प्राण वाचवले. मात्र या कुत्र्याला आपला जीव गमवावा लागला. 

Updated: Jun 29, 2018, 08:52 AM IST
विषारी साप तोंडात पकडून कुत्र्यानं पोलिसांचे प्राण वाचवले  title=

गडचिरोली :  इमानीपणाचं जिवंत उदाहरण म्हणून कुत्र्याचं उदाहरण दिलं जातं. आपल्या धन्याच्या रक्षणासाठी कुत्रा वेळप्रसंगी स्वतःच्या प्राणाचीही बाजी लावतो. याचाच प्रत्यय  गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा इथल्या जंगलात आला. धानोऱ्यापासून ६ किलोमीटर अंतरावरच्या मरकेगाव जंगलात एका अप्रशिक्षित कुत्र्यानं, मण्यार जातीच्या विषारी सापापासून पोलिसांचे प्राण वाचवले. मात्र या कुत्र्याला आपला जीव गमवावा लागला.

पोलीस आणि विषारी साप 

धानोरा पोलीस ठाण्यातल्या सुमारे ४० पोलिसांचं पथक मरकेगाव परिसरात गस्तीवर गेलं होतं. त्यांनी आपल्या सोबत एक कुत्राही नेला होता. हा कुत्रा प्रशिक्षित नव्हता. गावात भटकणारा हा कुत्रा खाकी वर्दीचा लळा लागल्यानं, पोलीस ठाण्यातच मुक्कामाला असायचा. तसंच पोलीस कुठेही गस्तीवर गेले की हा कुत्रा सुद्धा त्यांच्यासोबतच जायचा. मरकेगावात हे पोलीस पथक रात्री तंबूत वास्तव्याला असताना मण्यार जातीचा विषारी साप तंबूत शिरत होता. या विषारी सापाची चाहूल लागताच कुत्र्यानं सावध होत, त्या सापावर माती भिरकावून त्याला हुसकवायचा प्रयत्न केला. मात्र हा साप तंबूच्या दिशेनं येतच होता. अखेर कुत्र्यानं थेट त्या विषारी सापाला तोंडात पकडलं. लागलीच सापानं त्याच्या गळ्याला विळखा घालून दंश केला.

कुत्र्यानं प्राण सोडले 

कुत्र्यानं कशीबशी आपली सुटका करुन घेतली. मात्र, हळूहळू विषाचा प्रभाव त्याच्या शरिरावर जाणवू लागला. एव्हाना कुत्र्याचं भुंकणं ऐकून जाग्या झालेल्या जवानांनी सुरक्षित आश्रय घेतला. या दरम्यान जवानांचे प्राण वाचवून कुत्र्याने प्राण सोडले होते. त्याच्या जाण्यानं पोलिसांनी हळहळ व्यक्त केली आहे.