वडिलांच्या नावाला त्याने काळीमा फासला, मित्रांच्या नादाला लागून दरोडा घातला

साकोलीपासून 15 किलोमीटर अंतरावरील एका गावात डॉक्टरच्या घरात मोठा दरोडा पडणार अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. 

Updated: May 11, 2022, 06:01 PM IST
वडिलांच्या नावाला त्याने काळीमा फासला, मित्रांच्या नादाला लागून दरोडा घातला title=

भंडारा : एका डॉक्टरांच्या घरावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सहा दरोडेखोरांना भंडारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पहाटे पाच वाजता साकोली तालुक्यातील वलमाझरी फाट्यावर ही घटना घडली.

साकोलीपासून 15 किलोमीटर अंतरावरील एका गावात डॉक्टरच्या घरात मोठा दरोडा पडणार अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचला. दरम्यान, आज पहाटे वलमाझरी फाट्यावर सहा व्यक्ती मोटार सायकलवरून येताना पोलिसांना दिसले. 

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत त्यांची तपासणी केली. त्यावेळी त्यांच्याकडे लोखंडी रॉड, चाकू, मिरची पावडर, दोरी अशा घटक वस्तू आढळून आल्या. पोलिसांनी त्या वस्तू जप्त करत त्यांना पोलीस ठाण्यात आणले.  

त्या सहा दरोडेखोरांनी साकोली तालुक्यातील आमगाव येथील डॉ. वसंतराव बाळबुद्धे यांच्या घरी दरोडा टाकण्यासाठी जात असल्याचे सांगितले. तसेच, या दरोड्यामागे साकोलीच्याच एका प्रतिष्ठित डॉक्टरचा मुलगा मास्टर माईंड असल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे ज्या डॉक्टरांच्या घरावर हा दरोडा टाकण्यात येणार होता ते डॉक्टर आपल्या परिवारासह बाहेरगावी गेले आहेत. त्यांची आई एकटीच घरी होती. मात्र, भंडारा पोलिसांच्या या सतर्कतेने दरोड्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला आहे.