Disha Salian Case Aditya Thackeray Connection Sharmila Thackeray React: राज्यातील विधानसभेचे हिवाळी अधिवेशन वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे गाजत आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाची ठिणगी टाकणारं एक प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. हे प्रकरण म्हणजे दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूचं प्रकरण. दिशा सालियन प्रकरणामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरेंची एसआयटी (विशेष तपास समिती) मार्फत चौकशी होणार असल्याचं निश्चित झालं आहे. मुंबई पोलिसांनी राज्य सरकारच्या निर्देशानुसार एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. मागील हिवाळी अधिवेशनामध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानुसार आता एसआयटीकडून आदित्य यांची आता या प्रकरणात चौकशी होणार आहे. असं असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या प्रकरणाबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.
पत्रकारांनी दिशा सालियन प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन केली जात असल्याचा संदर्भ देत शर्मिला यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर देताना काकू शर्मिला यांनी पुतण्या आदित्य ठाकरे यांची बाजू घेतल्याचं पहायला मिळालं. मनसे आणि उद्धव ठाकरे गटामध्ये राजकीय मतभेद अनेकदा दिसून आले आहेत. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांवर अनेकदा टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र दिशा सालियन प्रकरणामध्ये कुटुंब म्हणून राज ठाकरेंचं कुटुंबिय आदित्य ठाकरेंच्या पाठिशी उभे असल्याचं दिसत आहे.
दिशा सालियन प्रकरणासंदर्भात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणाकडे कसं पाहता, असा प्रश्न पत्रकारांनी शर्मिला ठाकरेंना विचारला. हा प्रश्न ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता शर्मिता ठाकरेंनी, "आदित्य असं काही करेल असं मला वाटतं नाही," अशी प्रतिक्रिया नोंदवली. पुढे बोलताना शर्मिला ठाकरेंनी, "चौकश्या काहीही लावू शकतात. आम्ही पण याच्यातून खूपदा गेलो आहोत," असं म्हटलं आणि त्या निघून गेल्या. काही वर्षांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणामध्ये चौकशीसाठी सक्तवसुली संचलनालयाची नोटीस आली होती. राज यांची ईडीच्या कार्यालयामध्ये सखोल चौकशीही झाली होती. याच्याशीच शर्मिला यांच्या या वक्तव्याचा संदर्भ जोडला जात आहे.
2020 मध्ये अभिनेता सुशांतसिंह राजपूतची एकेकाळची मॅनेजर दिशा सालियनचा सुशांतचा मृत्यू होण्याच्या काही दिवसांआधी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्येचं असल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यानंतर पुढे या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आणि दिशावर सामूहिक बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला.
नारायण राणेंनी 2022 मध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर दिशा सालियानच्या आई-वडिलांनी राणेंविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणेंना समन्सही बजावलं होतं. दोघांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आपलं म्हणणं मांडलं होतं. नितेश राणेंनीही वेळोवेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिशाचा मृत्यू झाला त्या रात्री आदित्य ठाकरे कुठे होते? या प्रकरणाशी त्यांचं काय कनेक्शन आहे अशापद्धतीचे प्रश्न विचारले होते.
बऱ्याच वादानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. आता सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून आपला अहवाल सादर केलेला. दिशा सालियन प्रकरणामुळे 2021 आणि 2022 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा वाढवला होता. या प्रकरणात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंपासून अनेकांनी गंभीर आरोप केले. राणेंनी या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवरही गंभीर आरोप केले. मात्र, मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात दिशा सालियन प्रकरणात सीबीआयने मोठा खुलासा केला होता. सीबीआयने सादर केलेल्या अहवालात दिशाचा मृत्यू अपघातीच होता, असं स्पष्ट करण्यात आलेलं. त्यामुळे दिशाने आत्महत्या केल्याचा, बलात्कार झाल्याचा आणि खून झाल्याचे सर्व आरोप खोटे ठरले होते.
सीबीआयने दिलेल्या अहवालात दिशा सालियनचा दारूच्या नशेत तोल गेल्यानं आणि 14 व्या मजल्यावरून पडून डोक्याला गंभीर इजा झाल्यानं मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. दिशा सालियानचा 8 जून 2020 रोजी मालाड येथील निवासी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणीही अपघाती मृत्यूची नोंद केली होती. दिशा हिची हत्या झाली असून आदित्य यांचा या हत्येशी संबंध असल्याचा आरोप भाजप नेते नारायण राणे यांनी केला होता. त्यांनीही या प्रकरणी चौकशीची मागणी केली होती. सीबीआयने या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दिलाही. मात्र आता याची एसआयटी मार्फत पुन्हा तपास केला जाणार आहे.
दिशाच्या मृत्यूनंतर अवघ्या 6 दिवसांनी म्हणजेच 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत हा त्याच्या वांद्रे येथील त्याच्या घरामध्ये मृतावस्थेत आढळला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली. दरम्यान सुशांतच्या वडिलांनी त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती व तिच्या कुटुंबीयांनी सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसांत तक्रार दाखल केली होती. नंतर, हे प्रकरण सीबीआयकडे सोपण्यात आले. रिया आणि तिच्या कुटुंबीयांवरील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडीमार्फत) चौकशी सुरू आहे. रिया अमलीपदार्थाचे सेवन करत होती आणि तिने ते सुशांतलाही ड्रग्जचं व्यसन लावल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबियांनी केलेला. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अमलीपदार्थ नियंत्रण विभागाने केला.