खवय्यांच्या ताटातून मासे गायब होण्याची शक्यता

खवय्यांच्या ताटातून मासळी गायब होण्याची शक्यता आहे. याला कारण आहे मत्स्यदुष्काळ. समुद्रात मतलई वारे सुटलेत. त्यामुळे मच्छीमारांच्या तोंडचं पाणी पळाले आहे. 

Updated: Dec 1, 2020, 09:45 PM IST
खवय्यांच्या ताटातून मासे गायब होण्याची शक्यता  title=

रायगड : खवय्यांच्या ताटातून मासळी (Fish) गायब होण्याची शक्यता आहे. याला कारण आहे मत्स्यदुष्काळ. समुद्रात मतलई वारे सुटलेत. त्यामुळे मच्छीमारांच्या तोंडचं पाणी पळाले आहे. वाऱ्यामुळे समुद्रात जाळी टाकता येत नाही. जाळी टाकली तरी ती गुरफटून तुटतात. समुद्रात बोटी घालणं म्हणजे तोटा हे समीकरण झाले आहे. त्यातच जी मासळी मिळते तिलाही भाव मिळत नाही. त्यामुळं मासेमारांनी बोटी किनाऱ्यावर नांगरुन ठेवल्यात. मच्छीमार समुद्रात जात नसल्यानं सध्या किरकोळ बाजारात मासळीचे भाव वाढलेत. 

पुढचे काही दिवस अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. अलिबागच्या मच्छीमार जेट्टीवर सध्या नेहमीसारखी वर्दळ पाहायला मिळत नाहीय. सध्या डिझेल आणि बर्फाचाही खर्च निघत नाही. शिवाय खलाशांना पदरचे पैसे द्यावे लागतात. 

परिणामी बोटी किनाऱ्यांवर नांगरून ठेवण्यावाचून पर्याय नाही, असे मच्छिमारांनी सांगितलं. मासळीची आवक घटल्यानं मासेविक्रेत्या महिलांमध्येही नाराजीचा सूर आहे. जी काही डोलीची मच्छी येते तिला बाजारात उठाव नाही असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.