Anil Deshmukh Book Diary of Home Minister : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तुरुंगात असताना एक पुस्तक (Anil Deshmukh Book) लिहिले आहे. डायरी ऑफ होम मिनिस्टर (Diary of Home Minister) असे या पुस्तकाचे नाव आहे. लवकरच हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. या पुस्तकात अनिल देशमुखांनी खळबळजनक आरोप केले आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन होणारेय. खुद्द अनिल देशमुखांनी ट्विटवरून ही माहिती दिलीय. तुरुंगात असताना "डायरी ऑफ होम मिनिस्टर" हे पुस्तक लिहिलं. ते मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध होणार असल्याचं देशमुख म्हणाले. गृहमंत्री असताना षडयंत्र रचून खोटे आरोप करण्यात आले. ED आणि CBI चौकशीचा ससेमिरा लावून 14 महिने तुरुंगात टाकण्यात आल्याचंही देशमुख म्हणाले.
विदर्भात नागपूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघात त्यांचे पुत्र सलील देशमुख यांनी निवडणूक लढविण्याची तयारी चालवली आहे. त्यातच आता देशमुखी पुस्तकरुपी डायरी बॉम्बच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधणार आहेत.
दरम्यान, सचिन वाझेला हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळाला आहे. अनिल देशमुखांशी संबंधित दरमहा 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात सचिन वाझेला जामीन मंजूर झाला आहे. मात्र, मनसूख हिरेन हत्याकांड आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणातील कैदेमुळे वाझेचा मुक्काम तूर्तास कारागृहातच राहणार आहे. जामीनाच्या अटीशर्ती मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाला निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. अनिल देशमुखांसह याप्रकरणातील इतर आरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर झाल्याचा दावा करत सचिन वाझेनं जामीनासाठी याचिका केली होती.