'माझ्या मागे गुंड लागलेत...' Whatapp वर मेसेज आला, काही वेळात वीज कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला

धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातल्या महावितरण कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मृतदेह तापी नदीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. काही गुंड आपल्या मागे लागल्याचा मेसेच या कर्मचाऱ्याने व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकला होता. 

Updated: Jun 5, 2023, 05:07 PM IST
'माझ्या मागे गुंड लागलेत...' Whatapp वर मेसेज आला, काही वेळात वीज कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला title=

प्रशांत परदेशी, धुळे : धुळे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरपूर तालुक्यातल्या बाळले इथल्या महावितरण सबस्टेशन कार्यालयात (Mahavitran Substation Office) सिनीअर ऑपरेटर (Senior Operator) म्हणून काम करणाऱ्या प्रवीण गवते (Pravin Gavate) या कर्मचाऱ्याचा मृतदेह तापी नदीत (Tapi River) आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. धक्कादायक म्हणजे मृत्यूपूर्वी प्रवीण गवते यांनी एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर (Whats App) आपल्या मागे गुंड लागल्याचा मेसेज टाकला होता. त्यानंतर दोन तासातच त्यांचा मृतेदह तापी नदीपात्रात आढळला. 

काय होता मेसेज
प्रवीण गवते यांनी एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक मेसेज टाकला होता. आपल्या मागे काही गुंड मुलं लागली असून आपल्याला काही सूचत नाहीए, माझ्याकडे तीन लाख रुपये आहेत. मी कसा तरी स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. मला मदत करावी असं प्रवीण गवते यांनी आपल्या मेसेजमध्ये म्हटलं होतं. मेसेज आल्यानंतर प्रवीण गवते यांची शोधाशोध सुरु झाली. शोध घेत असताना त्यांची मोटरसायकल तापी नदी पुलाजवळ आढळली. थोड्यावेळातच त्यांचा मृतदेह तापी नदीपात्रात आढळला. पोलिसांनी प्रवीण गवते यांचा मृतदेह नदीबाहेर काढत शिंदखेडा इथल्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. 

पोलिस तपास सुरु
प्रवीण गवते यांनी केलेल्या आत्महत्याच्या प्रकरणात आता पोलीस चौकशी सुरु झाला आहे. त्यांचे मोबाईलचे कॉल डिटेल (Call Details) मागवण्यात आले आहेत. त्यावरून त्यांचं लोकेशन पाहिला जाईल. त्या ठिकाणी संशयास्पद काही दिसून आलं, तर त्या पद्धतीने पुढे कारवाई केली जाईल. तसंच प्रवीण गवते यांच्या नातेवाईकांशी देखील विचारपूस केली जाईल, अशी माहिती शिंदखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी दिली आहे.

अनेक प्रश्न उपस्थित
घटनेच्या दिवशी प्रवीण गवते नाईट शिफ्ट करुन सकाळी 8.30 च्या सुमारास चिमठाणे इथं आपल्या घरी जाण्यासाठी निघाले. पण साधारण तीन वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअॅपवर त्यांचा मेसेज आला. या मेसेजनंतर काही वेळानेच त्यांचा मृतदेह तापी नदीत आढळला. प्रवीण गवते यांच्या मृत्यूमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. प्रवीण गवते यांच्या मागे लागलेले गुंड कोण होते आणि कुठून आले होते? प्रवीण गवते यांनी आत्महत्या केली की त्यांनी जीव वाचवण्यासाठी तापी नदीत उडी मारली? आपल्याकडे तीन लाख रुपये असल्याचं प्रवी गणते यांनी मेसेजमध्ये म्हटलं होतं, ते तीन लाख रुपये कुठे आहेत? सकाळी 8.30 ला घरी जाण्यासाठी निघालेले प्रवीण दुपारी तीन वाजेपर्यंत कुठे होते? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उभे राहिले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.