कामासाठी मुलांना आजीकडे सोडलं अन्...; बहिण भावाचा आगीत होरपळून मृत्यू

Dhule Accident News : धुळ्यात झोपडीला लागलेल्या आगीत दोन भावंडांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आजी घराबाहेर गेली असता अचानक झोपडीने पेट घेतला आणि दोन्ही मुले होरपळली.

प्रशांत परदेशी | Updated: Feb 18, 2024, 02:51 PM IST
कामासाठी मुलांना आजीकडे सोडलं अन्...; बहिण भावाचा आगीत होरपळून मृत्यू title=

प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : धुळ्यातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. झोपडीला लागलेल्या आगीत होरपळून दोन भावंडांचा जागीच मृत्यू झाला आहे. धुळ्यातील लोणखेडी येथे झोपडीला आग लागून आजोळी आलेल्या नाशिक येथील दोघा बालकांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेनं धुळ्यात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत दोन्ही भावंडांचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी ही सगळी धक्कादायक घटना घडली. रेणू पवार, अमोल पवार अशी मृत बालकांची नावे आहे. त्यांचे आई वडील ऊस तोडीसाठी बारामतीला गेले आहे, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम उशिरा पर्यत सुरू होते.

नाशिकच्या सटाणा तालुक्यातील वडील दिंगरी येथील रहिवाशी असलेले नाना पवार यांना चार वर्षांची मुलगी रेणू व सात वर्ष वयाचा अमोल हा मुलगा आहे. नाना पवार यांची पत्नीचे माहेर हे धुळ्याच्या लोणखेडी येथे आहे. पवार दाम्पत्य हे ऊस तोडीसाठी पुणे जिल्हयातील बारामतीला गेले होते. त्यामुळे अमोल व रेणू हे दोघेही आजीसोबत लोणखेडी येथे थांबले होते. गावबाहेर एका टेकडीवर आजीसोबत झोपडीत ही मुले राहत होती. बालकांची आजी गुरांना पाणी देण्यासाठी बाजूला गेल्या होत्या. त्याचवेळी झोपडीला आग लागली.

घर टेकडीवर असल्यामुळे वाऱ्यामुळे आगीने जोर धरत झोपडीतील साहित्य व पालापाचोळ्याचे छताने पेट घेतला. या घटनेत रेणू व अमोल झोपडीतच अडकले. आजीने हा सगळा प्रकार पाहताच तिने आरडा ओरडा सुरु केला आणि मदत मागण्यास सुरुवात केली. त्यामुळे बाहेरुन बचावासाठी उशिराने प्रयत्न सुरू झाला. दुर्दैवाने या घटनेत दोन्ही मुलांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. 

यानंतर मोठ्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच धुळे तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रमोद पाटील, उपनिरीक्षक महादेव गुट्टे हे पथकासह दाखल झाले. यानंतर रुग्णवाहिकेतून मृतदेह हिरे रुग्णालयात हलविण्यात आले. आगीचे कारण अद्याप समोर आले नसले तरी चुलीतील विस्तवमुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. या घटनेनंतर मुलांच्या आई-वडीलांना या धक्कादायक घटनेबाबत कळवण्यात आले. यानंतर दोघे धुळयाच्या दिशेने रवाना झाले, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. या घटनेची धुळे तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यत आली आहे.