एकनाथ खडसे यांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस म्हणाले...

औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते.

Updated: Oct 21, 2020, 07:00 PM IST
एकनाथ खडसे यांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस म्हणाले... title=

मुंबई : एकनाथ खडसे यांच्याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, खडसेंनी राजीनामा द्यायला नको होता, ते जे बोलले ते अर्थसत्य आहे, त्यामुळे आता त्यावर बोलण्याची ही वेळ नाही. अशा परिस्थितीत कुणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं, त्यांनी मला व्हिलन ठरवलंय एवढंच. औरंगाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस बोलत होते.

एकनाथ खडसे  यांच्यासारखा मोठा नेता भाजपा सोडून जात आहेत, त्यामुळे जळगाव जिल्ह्यात भाजपाला फटका बसेल असं म्हणतायत, तर खरोखर भाजपाला फटका बसेल का, या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, छोट्यातला छोटा कार्यकर्ता किंवा नेता पक्षातून जातो तेव्हा फटका बसतोच.

पण पक्ष फार मोठा आहे, कुणाच्या गेल्याने तो थांबला नाही, कुणाच्या येण्याने तो इकडे-तिकडे झाला नाही. जळगाव जिल्हा हा भाजपचा जिल्हा आहे. जळगाव जिल्ह्यात भाजप आधीपासूनच मजबूत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं...

तसेच एकनाथ खडसे जे बोलले त्यांच्यावर चंद्रकांतदादा पाटील हे सविस्तर बोलणं झालं असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. योग्य वेळ आल्यावर एकनाथ खडसे यांनी केलेल्या आरोपांवर बोलू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.